जिल्ह्यात ऊस गाळपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:49+5:302021-01-14T04:09:49+5:30
५१ लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप: साखर उताऱ्यात घोडगंगाची बाजी (महेश जगताप) सोमेश्वरनगर: पुणे जिल्ह्यात साखर ...

जिल्ह्यात ऊस गाळपात
५१ लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप: साखर उताऱ्यात घोडगंगाची बाजी
(महेश जगताप)
सोमेश्वरनगर: पुणे जिल्ह्यात साखर हंगाम जोरदार सुरू असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मिळून ५१ लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ५१ लाख ११ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे. ऊस गाळपात खासगी साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे, तर १०.७५ चा साखर उतारा ठेवत घोडगंगा कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.
यावर्षीचा साखर हंगाम सुरुवातीपासूनच सर्वच बाजूने अडचणीत सापडला आहे. ऊसतोडणी, मुकादम व ऊस वाहतूक संघटना यांचा संप, करार करून देखील ४० टक्केच्यावर न आलेले ऊसतोडणी कामगार, तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस अशा अनेक अडचणींवर मात करत जिल्ह्यातील साखर कारखानदारी सुरूच आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी आता ऊसतोडणी कामगारांना पर्याय म्हणून ऊस हार्वेस्टिंग मशीनची उपलब्धता केली आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन वषार्पासून मुबलक पावसामुळे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढल्याने सर्वच साखर कारखान्यांना अतिरिक्त उसाचे संकट भेडसावत आहे. अनेक साखर करखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊस संपवण्यासाठी एप्रिल अखेर उजडणायची चिन्हे आहे.
'हाय रिकव्हरी पिरेड' मध्ये 'नो रिकव्हरी'...
१५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी हा दोन महिने हाय रिकव्हरी पिरेड म्हणून ओळखला जातो, मात्र यावर्षी पावसाचे जास्त प्रमाण, थंडी कमी, ढगाळ हवामान यामुळे बहुतांश साखर कारखान्यांचा साखर उतारा साडेदहा टक्केच्या आसपासच्या घुटमळत आहेत. त्याच बरोबर अनेक साखर कारखान्यांनी बी हेवी मोलासीस पासून थेट इथेनॉल निर्मिती करत असल्याने याचा काहीसा परिणाम साखर उताºयावर दिसून येत आहे.
ऊस गाळपास खासगी कारखान्यांची आघाडी
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मिळून ५१ लाख ५६ हजार ८८६ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ५१ लाख ११ हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये बारामती ॲग्रो व दौड शुगर या साखर कारखान्यांनी ऊस गळपास आघाडी घेतली आहे. बारामती ॲग्रो ने ७ लाख २ हजार १२० मेट्रिक टन उसाचे गाळप करत ६ लाख ४८ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर दोन नंबरला दौंड शुगरने ५ लाख ६६ हजार ४४५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ५ लाख ५३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर माळेगाव कारखान्याने ५ लाख ५५ हजार ८८५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ५ लाख ६० हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
'घोडगंगा' ची साखर उताऱ्यात बाजी...
रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने १०.७५ चा साखर उतारा ठेवत जिल्ह्यात बाजी घेतली आहे. तर व्यंकटेश कृपा शुगर ने १०.५९ चा साखर ठेवत दुसरा तर १०.३२ चा साखर उतारा ठेवत विघ्नहर व संत तुकारामने तृतीय क्रमांक ठेवला आहे.