अवकाळी पावसाचा पुन्हा फेरा
By Admin | Updated: March 29, 2015 00:20 IST2015-03-29T00:20:20+5:302015-03-29T00:20:20+5:30
शहर व उपनगराच्या काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसास जोर नव्हता. त्यामुळे तो काही वेळांतच गायब झाला. आज दिवसभर शहरात ढगाळ हवामान होते.

अवकाळी पावसाचा पुन्हा फेरा
पुणे : शहर व उपनगराच्या काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसास जोर नव्हता. त्यामुळे तो काही वेळांतच गायब झाला. आज दिवसभर शहरात ढगाळ हवामान होते.
शहरात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच शहर व उपनगरामध्ये ढगाळ हवामान होते. त्यामुळे पुणेकरांना उकाडा जाणवत होता. दुपारनंतर आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली आणि चारच्या सुमारास काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला.
पुढील ४८ तासांत शहराच्या काही भागांत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
चाकण : चाकण व परिसरात आज सायंकाळी सहा वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावून नागरिक व शेतकऱ्यांची तारांबळ उडवली. खालुंब्रे, निघोजे परिसरात जोरदार गारपीट झाली आहे. तर, खराबवाडी परिसरात झाडे पडल्याचे वृत्त आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक घरांची छपरे उडवली. मोठमोठी झाडे कोसळून पडली. १५ ते २0 मिनिटांत पाणीच पाणी झाले. गारपिटीमुळे आंब्याच्या कैऱ्यांचे नुकसान झाले.
चाकणसह खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, येलवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण, सावरदरी, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, कोरेगाव, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, बोरदरा, पिंपरी, भाम, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, वाकी परिसरात पाऊस झाला. (प्रतिनिधी)
जमीन भाजणीची कामे खोळंबली
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व आजच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला असून, जमिनीमधील उष्णता कमी झाल्याने आदिवासी भागातील जमीन भाजणीची कामे खोळंबली आहेत. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना जमीन भाजणीच्या कामाची प्रतीक्षा करण्याची वेळ यंदा आदिवासी शेतकऱ्यांवर आली आहे.