पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे यश

By Admin | Updated: May 10, 2017 04:07 IST2017-05-10T04:07:14+5:302017-05-10T04:07:14+5:30

नयना पुजारी खुन खटल्यातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ शहर गुन्हे शाखा आणि येरवडा पोलीस यांनी केलेल्या सांघिक कामगिरीचे हे यश आहे

The success of the team's teamwork | पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे यश

पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे यश

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नयना पुजारी खुन खटल्यातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ शहर गुन्हे शाखा आणि येरवडा पोलीस यांनी केलेल्या सांघिक कामगिरीचे हे यश आहे, असे तत्कालीन शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले़
८ आॅक्टोबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट ४ समांतर तपास करीत होते़ या वेळी सहायक पोलीस निरीक्षक कारभारी हंडोरे, शौकत सय्यद, पोलीस कर्मचारी असलम अत्तार, शिवसुंदर, स्वामी या आमच्या पथकाने गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली़
गुन्हा घडल्यानंतर १०व्या दिवशी यातील तीन आरोपींना पकडण्यात आम्हाला यश आले़ चौथा आरोपी स्वप्निल कदम हा अनेक महिने गायब होता़ तो मोहोळ -पंढरपूर रोडवर एका धाब्यावर थांबला असताना त्याला पकडण्यात आले़
याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार, दुचाकी जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ने येरवडा पोलिसांना साह्य केले होते़ आज या गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्याने पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे हे यश म्हटले पाहिजे़
निकालाने पोलिसांची प्रतिमा उंचावली
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या योगेश राऊतला सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात आमच्या पथकाला यश आले़ आजच्या निकालाने पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली, असे तत्कालीन दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी व्यक्तकेली़ योगेश राऊत पळाल्यानंतर गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली होती़ याविषयी गोवेकर यांनी सांगितले, की योगेश राऊत याच्याशी संबंधित अगदी लहानपणापासून असलेल्या मित्रांपासून त्याच्या सर्व जवळच्या लोकांची माहिती आमच्या पथकाने काढली़ अगदी तुरुंगात त्याच्याजवळ कोण होते, याचीही माहिती घेतली़ देवऋषीपासून डॉक्टरांपर्यंत संपर्क साधून त्याच्याविषयी काही माहिती मिळते का याचा शोध घेतला गेला़ तब्बल ६ महिने चिकाटीने केलेल्या प्रयत्नांनंतर योगेशची माहिती मिळाली व त्याला पकडण्यात यश आले़ आजच्या निकालाने समाजात योग्य संदेश गेला असून, पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे़
- सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक

Web Title: The success of the team's teamwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.