Success Story in Vaidu Community | ....परंपरेला छेद देत तो झाला सनदी लेखापाल...
....परंपरेला छेद देत तो झाला सनदी लेखापाल...

ठळक मुद्देवैदू समाजातील सुनील निंबाळकरची यशोगाथा : ग्रामस्थांकडून सत्कार, वाजतगाजत काढली मिरवणूक 

गोरख जाधव- 
बारामती : गावोगावी भटकंती करीत छोटे-मोठे व्यवसाय करण्याची वैदू समाजाची परंपरा. मात्र, या परंपरेला छेद देत आणि घरातील अठराविश्वे दारिद्र्यावर मात करीत डोर्लेवाडी येथील एका युवकाने शिक्षणाची वाट धरली. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि जिद्दीच्या जोरावर त्याने सनदी लेखपाल पदाला गवसणी घातली आहे. डोर्लेवाडी येथील सुनील निंबाळकर असे या युवकाचे नाव असून वैदू समाजातील तो पहिलाच लेखापाल ठरला आहे...  
घरातील परिस्थिती बेताची. कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सुनीलचे वडील श्यामराव निंबाळकर हे गावोगावी भटकंती करीत चाळणी व पत्र्याचे डबे विकायचे. ‘शिकणं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालावणं; आता लगिन झालंय कयतरी कामाधंद्याचं बघा,’ असा सल्ला देणारे अनेक जण सुनीलच्या अवतीभवती होते. मात्र, सुनीलने कुटुंबाचा विश्वास जिंकला होता. आई-वडील आणि बायकोच्या खंबीर पाठिंब्यावर त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. 
तोकड्या कमाईत श्यामराव यांनी सुनीलच्या शिक्षणाचा खर्च भागवला. तर, समाजिक चालिरीतींमुळे २०१६मध्ये सुनील याचाही वयाच्या २३व्या वर्षी विवाह उरकला. एकीकडे सांसारिक जबाबदारी पडली, तरीही उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुनीलने शिक्षण सोडले नाही. संसाराची जबाबदारी पडल्याने ‘आता शिकून काय करणार? कामाधंद्याचे पाहा,’ असा फुकटचा सल्ला देणारेही कमी नव्हते. मात्र, कुटुंबाचा असणारा भरभक्कम पाठिंबा सुनीलचे बळ वाढवत गेला. पुण्यात उच्च शिक्षणासाठी असताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोग इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. प्रचंड मेहनत घेत सुनील सनदी लेखापाल झाला. आपला मुलगा नेमकं काय शिकला, याची माहितीही नसलेले आई-वडील मात्र सुनीलच्या यशावर खूष आहेत. ‘त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं, ह्योच आमचापण आनंद,’ असं त्याचे वडील म्हणतात. 
........................
आई-वडिलांचा अभिमान...
घरची परिस्थिती अतिशय बेताची; परंतु संकटावर मात करीत त्याने बीकॉमची पदवी घेतली. निरंतर अभ्यास करून सनदी लेखपालपदी मजल मारली. या यशाबद्दल सुनीलच्या आई-वडिलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने सुनीलचा जाहीर सत्कार केला. समाजातील पहिलाच मुलगा उच्चशिक्षित झाल्याने समाजातील नागरिकांनी  सुनीलची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्याचे कौतुक केले. 

Web Title: Success Story in Vaidu Community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.