मार्गासनी : वेल्हे आयटीआयमधील विद्यार्थ्यांना एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर, वेळेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी सहा वाजता एसटीची मागणी येथील विद्यार्थी करीत आहेत. वेल्हे तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेल्हे येथे असून, येथे विविध व्यवसाय उपयोगी कोर्सेस चालू आहेत. भोर, वेळू, किकवी, शिरवळ व वेल्हे तालुक्यातून दुर्गम डोंगरी भागातून वेल्हे येथे विद्यार्थी येत आहेत. आयटीआयची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशी आहे. सकाळी मुलांना एसटी वेळेवर मिळते, पण सायंकाळी परत जाताना एसटी मिळत नाही. त्यामुळे येथील मुले दुपारी तीन वाजताच आयटीआय सोडतात. एसटी चार वाजता असल्याने बसथांब्यावर जातात. यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील तास होत नाहीत व शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी सहा वाजता भोर आगाराने सुरू केलेली यशवंती सेवा असते; परंतु या बसमध्ये विद्यार्थ्यांचे मासिक पास चालत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. एसटी चार वाजता असल्याने तीन वाजता आयटीआय सोडतात व बसथांब्यावर येतात. परंतु येथे बसथांब्यावर शेड नसल्याने उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. भूक-तहान लागल्याने हे विद्यार्थी हैराण होत आहेत. सायंकाळी सहा वाजता वेल्ह्यातील शासकीय कार्यालये सुटतात, पण एसटीअभावी कामगार अगोदरच पळ काढतात. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता एसटीची सोय व्हावी, अशी मागणी येथील विद्यार्थी करीत आहेत. (वार्ताहर)
वेल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा एसटीची
By admin | Updated: May 12, 2014 03:42 IST