विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
By Admin | Updated: August 13, 2015 04:31 IST2015-08-13T04:31:30+5:302015-08-13T04:31:30+5:30
बारामती शहरातील सातवी इयत्तेतील मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने फसला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
बारामती : बारामती शहरातील सातवी इयत्तेतील मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने फसला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत मएसो शाळेच्या मुख्याध्यापकांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बी. बी. साळुंके करीत आहेत.
सकाळी शाळेसाठी एसटी बसने आलेला हा मुलगा पायी तीन हत्ती चौकातून जात होता. नटराज नाट्यगृहासमोरील पदपथावर असताना काळ्या व्हॅनमधून आलेल्या तिघांनी त्याला घेरले. सकाळी गर्दी कमी असते. त्याला चॉकलेट देण्याचा बहाणा केला. त्याच वेळी तिघांपैकी एकाने ‘तुम्ही गाडी सुरू करा, मी याला घेऊन येतो,’ असे सांगितले. त्यामुळे सतर्क झालेल्या या मुलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. त्याच्या तावडीतून सुटून थेट शाळेकडे धूम ठोकली. या शाळेला तीन प्रवेशद्वार आहेत. बालनिरीक्षण गृहालगतच्या प्रवेशद्वारातून शाळेच्या प्रांगणात तो गेला. त्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. त्याचबरोबर तो आरडाओरडा करत धावत असताना रस्त्यावरील काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तेथून पलायन केले. हा प्रकार या मुलाने मुख्याध्यापक चव्हाण यांच्यासह शिक्षकांना सांगितला. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या मुलाने प्रसंगावधान दाखविले.
याबाबत मुख्याध्यापक भगवान चव्हाण यांनी शहर पोलिसांसह मुलाच्या पालकांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. काळ्या व्हॅनमधून आलेल्या तिघांनी सुरुवातीला तोंडाला स्कार्प बांधला होता.
घडलेली घटना मुलाने पोलिसांना सांगितली. गाडीसह तिघांचे वर्णन त्याच्याकडून घेतले. या प्रकारामुळे शहरात पालकवर्गात मात्र भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
कालच बारामतीत अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे प्रकार घडत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, बारामती शहरातच सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस अधिकाऱ्यांचा दावादेखील फोल ठरला आहे.
सर्व शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींनी दिलेला खाऊ स्वीकारू नये अथवा त्यांच्याबरोबर जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनीदेखील केले आहे.