‘अकरावी’साठी विद्यार्थी झाले ‘सैराट’

By Admin | Updated: July 29, 2016 04:03 IST2016-07-29T04:03:47+5:302016-07-29T04:03:47+5:30

‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू... अ‍ॅडमिशन द्या.’ अशी मागणी अकरावीत प्रवेश न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी केली असून, काही विद्यार्थ्यांनी

Student gets 'eleven' for 'Saraat' | ‘अकरावी’साठी विद्यार्थी झाले ‘सैराट’

‘अकरावी’साठी विद्यार्थी झाले ‘सैराट’

पुणे : ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू... अ‍ॅडमिशन द्या.’ अशी मागणी अकरावीत प्रवेश न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी केली असून, काही विद्यार्थ्यांनी उपोषणदेखील सुरू केले आहे. एरवी गांधीगिरीद्वारे आंदोलने केली जातात; मात्र आता ‘सैराट’ पद्धतीने आंदोलने करण्यात येऊ लागली आहेत.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी केंद्रीय नियंत्रण समितीतर्फे गुरुवारी १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने निश्चित करण्यात आले. तरीही शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. विद्यार्थी व पालक दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, आता विद्यार्थ्यांचा संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे चांगले गुण मिळूनही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी उपोषण सुरू केले. अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे शिक्षण विभागातर्फे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या वेळापत्रकानुसार प्रवेश मिळण्यासाठी आॅक्टोबर महिनाअखेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. तरीही कनिष्ठ महाविद्यालायात प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे.
गुणवत्ता असूनही केवळ पसंतिक्रम चुकल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. परंतु, शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी हेच का अच्छे दिन? असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे १५-१६ वर्षांच्या वयात विद्यार्थ्यांवर प्रवेश मिळविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ही शिक्षण विभागासाठी भूषणावह गोष्ट नाही. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न तत्काळ सोडवून विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर आॅफलाइन पद्धतीने संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनी उपोषण सोडावे म्हणून
महापौर प्रशांत जगताप यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर व सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांच्याशी चर्चा केली.

अकरावी प्रवेशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. सध्या पालकांच्या मागणीनुसार सर्वांना एकदम प्रवेशाची संधी दिल्यास विद्यार्थी आणि पालकांना केवळ अर्ज भरण्याचे समाधान मिळेल. परंतु, पाचव्या फेरीनंतर कॉलेजांमध्ये रिक्त राहणाऱ्या नेमक्या जागांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यास त्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळू शकेल. विद्यार्थी व पालकांनी संयम ठेवावा आणि आॅनलाइन प्रक्रियेला सहकार्य करावे.
- विनोद तावडे,
शिक्षणमंत्री

वयाच्या १५-१६व्या वर्षी विद्यार्थ्यांना उपोषण करण्याची वेळ येते. हे दुर्दैवी असून विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न तत्काळ सोडवावा. त्यासाठी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधावा. महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत.
- प्रशांत जगताप,
महापौर

Web Title: Student gets 'eleven' for 'Saraat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.