चापेकर समूहशिल्पासाठीही संघर्ष

By Admin | Updated: July 7, 2016 03:32 IST2016-07-07T03:32:48+5:302016-07-07T03:32:48+5:30

स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि रँडचा वध करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूचे समूहशिल्प साकारण्यासाठी चिंचवडकरांना संघर्ष करावा लागला. प्रशासकीय दिरंगाई

The struggle also for the Chapekar group | चापेकर समूहशिल्पासाठीही संघर्ष

चापेकर समूहशिल्पासाठीही संघर्ष

चिंचवड : स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि रँडचा वध करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूचे समूहशिल्प साकारण्यासाठी चिंचवडकरांना संघर्ष करावा लागला. प्रशासकीय दिरंगाई आणि लालफितीच्या कारभारात गेली आठ वर्षे हा प्रकल्प रखडला. त्याला मुहूर्त सापडला असून, लवकरच पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
बंदूक रोखून उभे असलेल्या चापेकरांचा पुतळा हे चिंचवडचे वैभव. क्रांतिवीर चापेकर बंधू यांचा जन्म, बालपण, शिक्षण चिंचवडमध्येच झाले. रँडवधाची पूर्वतयारीही चिंचवडलाच झाली. एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी देशाच्या स्वातंत्र्यात बलिदान दिले. शौर्याची साक्ष देणारा स्मृतिस्तंभ, पूर्णाकृती पतुळा १९७१मध्ये चिंचवडगावातील चौकात उभारला गेला. पुढे गावाचे नगरपालिकेत आणि नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्या वेळी हा स्तंभ चिंचवडची ओळख बनला आणि चापेकर चौक अशी ओळख झाली. महापालिकेने तीन फूट उंचीचे पुतळे तयार करण्याची निविदाही प्रसिद्ध केली. मात्र, चौकाच्या मानाने हे शिल्प अत्यंत लहान असल्याचे चिंचवडकरांच्या लक्षात आले.
क्रांतिवीर चापेकर समितीचे प्रमुख गिरीश प्रभुणे, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे बाळकृष्ण पुराणिक, नगरसेविका अश्विनी चिंचवडे
यांनी ही बाब तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हे काम थांबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर पुन्हा समूहशिल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. २६ जानेवारी २०१४ला या कामाची सुरुवात झाली. (वार्ताहर)

पिंपरी-चिंचवडचे वैभव असणाऱ्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करावे, अशी अपेक्षा चिंचवडकरांनी व्यक्त केली होती. मात्र, महापालिकेत सत्ता राष्ट्रवादी काँगे्रसची आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या भागाचा खासदार शिवसेनेचा आहे. चिंचवड विधानसभेत येणाऱ्या या भागाचा आमदार भाजपाचा आहे. महापौरांनी पत्र दिल्यास उद्घाटनास कोणाला बोलवायचे, हे निश्चित होते. मात्र, या कामाचे श्रेय दुसऱ्या पक्षाला जाऊ नये म्हणून महापौरांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा अन्य राज्य किंवा राष्ट्रीय नेत्याला पत्र दिले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते या शिल्पसमूहाचे अनावरण होणार आहे.

... असे आहे समूहशिल्प
शिल्पकार दीपक थोपटे यांनी शिल्पसमूहाची निर्मिती केली आहे. तर वास्तुविशारद सचिन शहा आहेत. समूहशिल्पाचा चौथरा १८ फूट उंचीचा असून, शिल्पसमूहाची एकूण उंची ५० फूट आहे. त्यातील क्रांतिवीर दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर यांचे पूर्णाकृती पुतळे १२ फूट उंचीचे असून, तर वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे यांचा आसनस्थ पुतळा सात फुटांचा आहे.

प्रशासकीय दिरंगाईमुळे विलंब
समूह शिल्पाचे जुने काम रद्द करणे, त्याकरिता मान्यता घेणे, नवीन आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात निधीची तरतूद करणे, नवीन आराखडा तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, त्यास विधी समिती, सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची मान्यता घेणे यासाठी कालावधी गेला.

परवानग्यांसाठी संघर्ष
महाराष्ट्र कलासंचलनालयाची मान्यता घेणे, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांची मान्यता, पुणे पोलीस आयुक्तालय, वाहतूक पोलीस, जिल्हा पुतळा समिती यांच्या परवानग्यांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले. वाहतूक विभागाने तर तीन महिने परवानगी रोखून ठेवली होती.

Web Title: The struggle also for the Chapekar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.