दहावीच्या परीक्षेत खेळाडूंचीही भरारी
By Admin | Updated: June 23, 2014 01:19 IST2014-06-23T01:19:11+5:302014-06-23T01:19:11+5:30
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत खेळाडू विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतही बाजी मारली

दहावीच्या परीक्षेत खेळाडूंचीही भरारी
मिलिंद कांबळे, पिंपरी
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत खेळाडू विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतही बाजी मारली. केवळ खेळाडूंसाठी असलेल्या शहरातील महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालय आणि ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या क्रीडाकुलाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.
शालेय व क्रीडा संघटनांच्या विविध स्पर्धांत वर्षभर सहभागी होऊन खेळाडूंनी यश मिळविले. अनेक खेळाडू स्पर्धेसाठी १५ दिवस बाहेरगावी होते. वर्षात किमान तीन ते चार स्पर्धांत प्रत्येक खेळाडूने सहभाग नोंदविला. मैदानावर दररोज सराव करीत त्यांनी घाम गाळला. दररोज किमान २ तास सराव केला. दहावीत असूनही त्यांनी सरावाकडे दुर्लक्ष केले नाही.
शिक्षकांनी त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. शिक्षकांच्या मदतीने त्यांनी शिल्लक अभ्यासक्रम पूर्ण केला. सराव व स्पर्धा काळातील अभ्यासक्रम भरून काढत त्यांनी उर्वरित काळात अभ्यासाकडे लक्ष दिले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकणाऱ्या खेळाडंूनी दहावीतही उल्लेखनीय कामगिरी केली.
उद्यमनगर, पिंपरी येथील क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाच्या ओंकार पालांडे याने ९२.२० टक्के गुण घेत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. महापालिकेच्या १ लाख रुपये बक्षिसास तो पात्र ठरला आहे. ऋषिकेश धडके याने ८६.८० टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्याने ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे, तर समीक्षा गोळे हिने ७७.८० टक्के गुण मिळविले.
हे सर्व अॅथलेटिक्स खेळाडू आहेत. पालांडे हा उंच उडीचा राज्यस्तरीय खेळाडू आहे. राज्यस्तरीय खेळाडू धडके याचा अडथळा शर्यत हा क्रीडा प्रकार आहे. गोळे ही धावपटू आहे. ती राज्य स्पर्धा पदकविजेती आहे. दहावीच्या वर्गात एकूण ३८ विद्यार्थी होते. ते सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शिवाय त्यांची वर्षभरातील क्रीडा कामगिरीही प्रशंसनीय आहे. २०१२ ला १०० टक्के व गेल्या वर्षी ९६ टक्के निकाल होता. आठ वर्षांतील निकाल पाहता खेळाडूंनी शैक्षणिक प्रगतीही उंचावली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब सातव यांनी दिली.
निगडी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या क्रीडाकुलातील संकल्प कुलकर्णी याने ९१.२० टक्के गुण घेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. तो राज्य योगासन स्पर्धेतील विजेता खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय योगापटू असलेल्या साक्षी महाले हिने ८८.८० टक्के गुण प्राप्त करीत दुसरे स्थान मिळविले. महाले हिची दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या चौथ्या आशियाई योगा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
मुग्धा कुलकर्णी हिने ८५.६० टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक मिळविला. ती कबड्डी व अॅथलेटिक्स खेळाडू आहे. कबड्डीत राज्यस्तरावर आणि तिहेरी उडी व ४ बाय १०० मीटर रिले धावणे प्रकारात राज्य स्तरावर यश मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय योगपटू वैष्णवी आंद्रे हिने रशिया व पॅरिस येथे झालेल्या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील गटात प्रत्येकी रौप्यपदक जिंकले. तिने दहावीत ७७ टक्के गुण कमावले.
अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत यशस्वी कामागिरी केली आहे. त्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करीत अभ्यासातही चमकदार कामगिरी केली आहे. यंदा एकूण ३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तीन वर्षांपासून शाळेचा निकाल १०० टक्के आहे, अशी माहिती क्रीडाकुल प्रमुख भगवान सोनवणे यांनी दिली.