एसटी कामगारांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: July 19, 2014 03:35 IST2014-07-19T03:35:43+5:302014-07-19T03:35:43+5:30

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नारायणगाव आगाराच्या वतीने एसटी संदर्भातील विविध मागण्यांकरिता नारायणगाव आगारात धरणे आंदोलन करण्यात आले़

Strike movement of ST workers | एसटी कामगारांचे धरणे आंदोलन

एसटी कामगारांचे धरणे आंदोलन

नारायणगाव : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नारायणगाव आगाराच्या वतीने एसटी संदर्भातील विविध मागण्यांकरिता नारायणगाव आगारात धरणे आंदोलन करण्यात आले़
डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ, टायर व सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ, समपातळीवर नसलेली प्रवासी वाहतूक स्पर्धा, शासकीय प्रतिकूल धोरण यामुळे सन २०१२-२०१३ पासून एसटी तोट्याच्या दिशेने चालली आहे़ एसटीच्या उत्पन्नवाढीकरिता अधिक लक्ष देणे गरजेचे आहे़ तथापि, प्रवाशांच्या गरजेप्रमाणे नवीन गाड्यांच्या व मनुष्यबळाच्या अभावामुळे विस्तार रोखला जात आहे, न्यायालयीन निर्णयानुसार अवैध खासगी प्रवासी वाहतुकीवर संपूर्ण बंदी आणली जात नाही़
त्यामुळे, वार्षिक रू़ ५०० कोटी इतक्या उत्पन्नापासून महामंडळ वंचित राहत आहे़. त्याची भरपाई शासनाने द्यावी, तोट्यातील डेपो बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा़ शासनाने महामंडळाला देय असलेल्या रू़ १६३० कोटी इतकी रक्कम रोख स्वरूपात महामंडळास द्यावी़ पथकरापोटी (टोल टॅक्स) महामंडळास प्रतिवर्षी रू़ १२५ कोटी इतका खर्चाचा बोजा येतो आहे़
एसटी ही सार्वजनिक वाहतुकीचे वाहन असल्यामुळे पथकरातून सूट देण्याबाबतच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी सर्वच मार्गावर होणे आवश्यक आहे़. किफायतीशीर नसलेल्या मार्गावरील सेवेमुळे महामंडळास होणाऱ्या वार्षिक रू़ ३३० कोटी आर्थिक तोट्याची प्रतिपूर्वी शासनाने महामंडळास करावी़
खासगी बस व एसटी बसमधील विविध करांमध्ये असलेली तफावत दूर करावी़ शासनाने डिझेलवरील विक्रीकर कमी करावा़ यासाठी शासनाने विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागण्यपूर्वी या मागण्यांची पूर्तता करावी; अन्यथा संघटना व्यापक टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे़
या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून राज्यभर डेपोच्या गेटवर आज दि़ १७ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले़.
या वेळी गणेश गाढवे, खजिनदार युवराज गेंगजे, माजी सोसायटी चेअरमन रामदास आंबटकर व दत्ता हाडवळे, बनदेव परदेशी, संजय गाडेकर, पांडे मामा, विठ्ठल रावते, मुक्ता दळवी, प्रकाश शिंदे, सागरे टाकळकर, गणेश रासकर, सिकंदर इनामदार आदी कर्मचारी हजर होते़

Web Title: Strike movement of ST workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.