Pune Mangeshkar Hospital: पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून पैशांअभावी झालेल्या अडवणुकीमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं सांगत अहवाल आल्यानंतर सदर रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनीही या घटनेची दखल घेत कारवाईचे संकेत दिले आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "अधिकचे पैसे न भरल्यामुळे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात एका महिलेला उपचार नाकारण्यात आले. यामुळे सदर महिलेचा जीव गेला आहे. ही अस्वस्थ करणारी आणि मन सुन्न करणार घटना आहे. या घटनेबाबत एका समितीला सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून रुग्णाच्या नातेवाईकांचंही म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यानंतर चौकशी समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालाच्या आधारे सदर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा आबिटकर यांनी दिला आहे.
दरम्यान, "मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट अॅक्टखाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा आणि सुविधांचा लाभ या रुग्णालयाला दिला जातो. असं असताना या रुग्णालयाकडून रुग्णाला दाखल करून घेण्याआधीच पैशाची मागणी करण्यात आली असेल आणि काही चुकीचा प्रकार घडला असला तर मंगेशकर रुग्णालयावर शासनाच्या वतीने कठोर कारवाई आपण करणार आहोत," असंही प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
पुण्यात घडलेल्या या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी म्हटलं आहे की, "या घटनेची आम्ही नोंद घेतली आहे. संबंधितांवर उचित कारवाई करणार आहोत. भाडेतत्वावर कोणालाही जमीन देताना काही अटी असतात त्या अटी-शर्थी बघून निर्णय घेऊ. याप्रकरणी कडक कारवाई करणं आवश्यक आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं, हे कळणार आहे. दोन दिवसात हा अहवाल देण्यास आम्ही सांगितलं आहे," अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी २० लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील १० लाख रुपये तातडीने भरण्याची अट घातली. कुटुंबीयांनी तत्काळ ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तसेच उर्वरित रक्कम काही वेळाने भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र, रुग्णालयाने पूर्ण रक्कम भरण्याच्या मागणीवर ठाम राहत, आर्थिक ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जावं, असा सल्ला दिला. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.