गुणवत्तेचे बलस्थान : भारती विद्यापीठ

By Admin | Updated: May 10, 2017 03:51 IST2017-05-10T03:51:14+5:302017-05-10T03:51:14+5:30

शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि संशोधन कार्यासाठी नॅकतर्फे ए प्लस दर्जा देऊन गौरवण्यात आलेल्या भारती विद्यापीठाची आजवरची

The strength of quality: Bharati Vidyapeeth | गुणवत्तेचे बलस्थान : भारती विद्यापीठ

गुणवत्तेचे बलस्थान : भारती विद्यापीठ

शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि संशोधन कार्यासाठी नॅकतर्फे ए प्लस दर्जा देऊन गौरवण्यात आलेल्या भारती विद्यापीठाची आजवरची ५३ वर्षांतील वाटचाल कौतुकास्पद आहे. सर्व समाजघटकांना सामावून घेणारे भारती विद्यापीठ आता आधुनिक युगाकडेही तितक्याच ताकदीने झेप घेत आहे, अशा भारती विद्यापीठाचा आज वर्धापन दिन. त्या निमित्ताने मांडलेला प्रगतीचा आलेख...
भारती विद्यापीठाची गेल्या ५३ वर्षांतील वेगवान, खडतर, यशस्वी वाटचाल बारकाईने पाहिली म्हणजे आपल्या लक्षात येते, की शून्यातून प्रारंभ करून जागतिक कीर्ती संपादन करणार ही एक दर्जेदार व आगळी-वेगळी संस्था आहे. या ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये भारती विद्यापीठाने जपलेली सामाजिक बांधिलकी, ठाम वैचारिक भूमिका व ध्येयनिष्ठ वाटचाल यांमधून संस्थेने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात वेगळे, तेजस्वी व भक्कम स्थान निर्माण केले आहे. सतत जपलेली सामाजिक बांधिलकी व ठाम वैचारिक बैठक हे भारती विद्यापीठाचे बलस्थान आहे.
गरिबीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये म्हणून शिक्षण फीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना दर वर्षी रुपये पाच ते सात कोटी रकमेची प्रचंड फी सवलत देणारी भारती विद्यापीठ ही राज्यातीलच नव्हे, देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव संस्था आहे.
झोपडपट्टी वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील गरिबांच्या मुलांना शिक्षणाची दालने उपलब्ध करून दिली. अशा कुटुंबातील युवकांना नोकऱ्या देऊन त्यांचे संसार फुलविले. पुणे, मुंबई, नवी दिल्ली, कोल्हापूर, सांगली, पाचगणी, कराड, सोलापूर, जव्हार अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संकुले उभारली. संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साखर कारखाना, सूत गिरण्या, बँक ग्राहक भांडार, दूध संघ, कुक्कुटपालन संघ अशा सहकारी संस्थेच्या कार्याद्वारे निकोप सहकारी चळवळ उभी केली. भारती विद्यापीठाने आपल्या या चौफेर कार्याद्वारे ग्रामीण व शहरी संस्कृतीमध्ये सेतूबंधनाचे कार्य केले.
भारती विद्यापीठने शाखांचे नामकरण करताना सुरुवातीपासून एक ठाम वैचारिक भूमिका निश्चित केली आहे. केवळ मोठ्या देणग्या मिळविण्यासाठी धनाढ्य व्यक्तींची नावे शाखांना न देण्याचे धोरण संस्थेने सुरुवातीपासूनच अवलंबिले आहे. समाजासाठी व देशासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या थोर व्यक्तींची नावे शाखांना देऊन अशा थोर व्यक्तींचे जीवन दीपस्तंभाप्रमाणे नवीन पिढीसमोर ठेवण्याची आदर्श भूमिका भारती विद्यापीठने जपली आहे.
राज्यशासनाच्या व केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यासाठी भारती विद्यापीठ ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने गेली ४० वर्षे प्रभावी कार्य होत आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना, साहित्यिकांना संधी देण्याच्या उद्देशाने संस्थेने ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित करण्याचे उपक्रम राबविले. कडेगाव येथे ग्रामीण भागातील मुलींना विविध विद्याशाखांची दालने उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून भव्य महिला शिक्षण संकूल उभारले. कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या आधुनिक, सुसज्ज कुस्ती केंद्रामध्ये ग्रामीण भागातील गुणवंत व सक्षम कुस्तीगीर मुलांना प्रशिक्षणाची मोफत सोय करून त्यांना दरमहा संस्थेच्या वतीने मानधनही देण्याची सोय केली आहे.
विविध ठिकाणी शैक्षणिक संकुल व बहुविध विद्याशाखा असणारे व आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्र लाभलेले भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे देशातील पहिलेच अभिमत विद्यापीठ आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आठ एकर जागेत भव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा विक्रम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून संस्थेची कीर्ती आहे.
आजपर्यंत विकासाचे तुषार पोहोचले नाहीत, अशा दुर्गम, आदिवासी भागांमध्ये, सागर किनारी खाड्यांच्या परिसरातील छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागातील दुष्काळी, वंचित भागांमध्ये नवीन पिढीपर्यंत ज्ञानाची गंगा घेऊन जाणारी, कोणतीही लोकवर्गणी न घेता स्वत: गुंतवणूक करून सर्व शाळांना भव्य प्रासादतुल्य इमारती व अन्य उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी एक अद्वितीय शिक्षणसंस्था म्हणून भारती विद्यापीठाचा परिचय आहे.
अमेरिकेतील मराठी कुटुंबातील मुलांसाठी मराठी भाषा अध्यापनाचा उपक्रम राबविणारी भारती विद्यापीठ ही महाराष्ट्रातील एकमेव व पहिली शिक्षणसंस्था आहे. भारती विद्यापीठाने या उपक्रमाद्वारे मराठी भाषेचा झेंडा अमेरिकेत फडकविला, हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे.
देशातील विद्यापीठांच्या व महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल या शिखर परिषदेने भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाला ए प्लस श्रेणी प्रदान करून विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व संशोधन कार्याचा गौरव केला होता. आता तिसऱ्या वेळी नॅककडून ‘ए प्लस’ श्रेणी संपादन केल्याने भारती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारती विद्यापीठने सुपरफास्ट एक्सप्रेसप्रमाणे ५३ वर्षा$िंचा प्रदीर्घ टप्पा गतिमानतेने पार केला आणि आता २१ व्या शतकातील आधुनिक युगाकडे झेप
घेण्यासाठी संस्था सक्षम आणि सज्ज आहे.
-वसंतराव माने

Web Title: The strength of quality: Bharati Vidyapeeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.