आयटीपार्क मध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकीलवर हल्ला; वेळीच सुटका झाल्याने प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 22:24 IST2023-11-21T22:24:31+5:302023-11-21T22:24:44+5:30
शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

आयटीपार्क मध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकीलवर हल्ला; वेळीच सुटका झाल्याने प्राण वाचले
हिंजवडी : घरा समोरील मोकळ्या जागेत खेळत असणाऱ्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. केवळ दैव बलवत्तर म्हणून नागरिकांनी तिची वेळीच सुटका केल्याने तीचे प्राण वाचले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलेचे प्राण थोडक्यात वाचले असून, तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते.
अलिशा शेख (वय ४) राहणार बोडकेवाडी, माण असं चिमुकलीचे नाव असून, सध्या ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सध्या, माण परिसरात भटक्या कुत्र्यांची नवनवीन टोळकी रात्रीच्या अंधारात कोठून अवतरतात हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे. तर, महापालिकेच्या हद्दीतील मोकाट कुत्री रात्रीच्या अंधारात हिंजवडी, माण परिसरात सोडली जातात अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात आहे. आता पर्यंत माण, हिंजवडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक ग्रामस्थ जायबंदी झाले आहेत.
विशेष म्हणजे एकट्या बोडकेवाडीत दोघांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नाहक आपले प्राण गमावले लागले आहेत. मोकाट कुत्री एवढी हिंस्र होतात तरी कशी? त्यांच्यावर आवर कोण घालणार असा प्रश्न आता स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहे. अलिशाच्या पालकांशी संपर्क साधला असता, बोडके वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, वेळीच लक्षात आल्याने अलिशाला जखमी अवस्थेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याचे सांगितले. मात्र, मोकाट कुत्र्यांमुळे येथील नागरिकांचे जगणं अक्षरशः मुश्किल झाले असून, याची प्रशासनाने वेळीच दाखल घ्यावी अशी आग्रही मागणी माण आयटीपार्क परिसरातून होत आहे.