तुकोबारायांच्या सोहळ्याची सांगता

By Admin | Updated: August 11, 2015 03:50 IST2015-08-11T03:50:01+5:302015-08-11T03:50:01+5:30

भाळी चंदनाचा गंध, मुखी विठुरायाचे नाम, हाती टाळ-वीणा, मृदंगाचा निनाद आणि अभंगाचा गजर करीत हलक्या पावसाच्या सरी पडत असताना भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी भंडाऱ्याची

The story of Tukobaraya's story | तुकोबारायांच्या सोहळ्याची सांगता

तुकोबारायांच्या सोहळ्याची सांगता

देहूगाव : भाळी चंदनाचा गंध, मुखी विठुरायाचे नाम, हाती टाळ-वीणा, मृदंगाचा निनाद आणि अभंगाचा गजर करीत हलक्या पावसाच्या सरी पडत असताना भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी भंडाऱ्याची उधळण करीत श्री संत तुकाराममहाराज पालखीचे सोमवारी दोनच्या सुमारास आषाढवारी करून देहूत आगमन झाले. देहूकरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे आनंदमय वातावरणात स्वागत केले. पालखीची ३३० वी आषाढी वारी संपन्न झाली.
पहाटे नित्यपूजा उरकल्यानंतर पिंपरी येथून पालखी देहूगावाकडे निघाली असता, रस्त्यात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. पालखीचे स्वागत देहूगावच्या उपस्थित ग्रामस्थांनी केले. पालखीसमवेत संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, सुनीलमहाराज दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे,अभिजित मोरे,जालिंदर मोरे आदी उपस्थित होते.
पालखी मंदिरासमोर आल्यानंतर महाद्वार आरती झाली. मुख्य मंदिरात दिलीप नारायण मोरे इनामदार यांनी संत तुकाराममहाराजांच्या पादुका डोक्यावर घेतल्या व त्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नेल्या. येथे बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर, हे माहेर संतांचे हा अभंग झाला. यानंतर दिलीप मोरे यांच्या हस्ते आरती झाली. आरती झाल्याबरोबर उपस्थित वारकऱ्यांनी ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ नामाचा जयघोष करीत पताका उंचावून तुतारी, शंख, नगारा व ताशाचा गजर व नाद केला. या वेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. आरतीनंतर चांदीची अब्दागिरी, सावलीचे रेशमी छत्र, गरूड टक्के, पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा घातली. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानाच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार झाला. (वार्ताहर)

प्रत्येक वर्षी पालखी परत येताना वारकऱ्यांची गर्दी खूपच कमी असते. मात्र या वर्षी पालखी माघारी येतानादेखील मोठ्या संख्येने वारकरी होते. गर्दी जास्त व पोलीस बंदोबस्त कमी अशी परिस्थिती होती. पालखी प्रस्थानाच्या तुलनेत बंदोबस्त कमी असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण करणे व वाहतूक सुरळीत ठेवणे पोलिसांना अवघड जात होते. पालखीबरोबर आलेली वाहने थेट गावात वारकऱ्यांसमवेत आली होती. परिणामी पालखी मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. देहू-आळंदी रस्ता बराच वेळ बंदच होता. दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी-चिंचवड भागातील शाळा सुटत असल्याने त्यांची वाहने गर्दीत अडकली होती.

Web Title: The story of Tukobaraya's story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.