का-हाटीत ग्रामस्थांचा रास्ता रोको
By Admin | Updated: January 5, 2015 00:35 IST2015-01-05T00:35:49+5:302015-01-05T00:35:49+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ७३ एकर जमीन शरद पवार अध्यक्ष

का-हाटीत ग्रामस्थांचा रास्ता रोको
बारामती/काऱ्हाटी : जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ७३ एकर जमीन शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेला हस्तांतरित करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्याचबरोबर जमीन मूळ संस्थेकडेच कायम राहावी, या मागणीसाठी आज बारामती-पुणे राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, विविध पदांवर असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान २२२ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अजित पवारांनी ‘कृषी मूल’ संस्थेची जागा बळकावली
माजी मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या संस्थेचा विकास होईल, या उद्देशाने त्यांना ‘कृषी मूल’ संस्थेचे अध्यक्ष केले होते. मात्र, त्यांनी फक्त एक इमारत बांधून तेच विश्वस्त असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेकडे मोक्याच्या ठिकाणची ७३ एकर जागा हस्तांतरित केली. त्याच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्याच दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जागा हस्तांतरित केली. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी सर्वांना अंधारात ठेवून हा प्रकार केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आज पुणे-बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद वाबळे, माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीपराव खैरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कौले, शहराध्यक्ष अॅड. नितीन भामे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, माजी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते महादेव खंडाळे, सरपंच सुरेखा खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जमीन हस्तांतरण प्रकरणात महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढादेखील उभा राहणार आहे, अशी माहिती महादेव खंडाळे यांनी दिली. शाळेच्या माजी विद्यार्थिनी अश्विनी खैरे यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेचा विकास अजित पवार यांनी पाहिला आहे. त्याला सर्व विद्यार्थी नेटाने विरोध करतील, अशी ग्वाही दिली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भामे, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी पाठिंबा दिला. माजी विद्यार्थी गणेश जाधव यांनी आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.