पाणीपुरवठा योजना पडल्या बंद

By Admin | Updated: August 14, 2015 03:15 IST2015-08-14T03:15:59+5:302015-08-14T03:15:59+5:30

दौंड तालुक्याच्या जिरायत भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

Stop the water supply scheme | पाणीपुरवठा योजना पडल्या बंद

पाणीपुरवठा योजना पडल्या बंद

वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. पाण्याअभावी या भागातील काही गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनाही बंद पडल्या आहेत. तर, काही गावाच्या पाणीपुरवठा योजनांची पाणीपातळी खालावल्याने त्या अडचणीत आल्या आहेत.
तालुक्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी परिसरातील तलाव व बंधारे ऐन पावसाळ्यातही कोरडे ठणठणीत असल्याने या भागातील शेती ही पूर्णपणे अडचणीत आली आहे.
पावसाअभावी जिरायत भागातील भूजलपातळीत नीचांकी घट झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने हिंगणीगाडा (ता. दौंड) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अडचणीत आली आहे. गावासाठी सुरू असलेला पाणीपुरवठाही यामुळे तीन महिन्यांपासून बंद पडला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते.
वासुंदे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त असलेल्या बोअरवेलचीही पाणीपातळी अत्यंत कमी झाली आहे. या ठिकाणच्या नागरिकांनासुद्धा नजीकच्या काळात तीव्र पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास अशाच प्रकारची स्थिती कमीअधिक प्रमाणात या भागातील सर्वच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची झाल्याने जनतेला पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील ताम्हाणवाडी येथील नागरिकांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे अजूनही पुरेसा पाऊस न झाल्यास व पावसाने ओढ दिल्यास दौंड तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, या भागातील टँकरची मागणी वाढणार आहे.

Web Title: Stop the water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.