पुणे : विधानसभेच्या निवडणुकीत काहीतरी अनाकलनीय झाले आहे, असा संशय नागरिकांच्या मनात आहे. या संशयाचे निराकरण करणे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यामुळेच राज्यघटनेने त्यांना स्वायत्त ठेवले आहे. त्यांनी जबाबदारीने काम करावे; अन्यथा लोकशाही राज्यव्यवस्थेचा पायाच असलेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होईल, असे मत विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. २५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सरोदे यांनी यावेळी काँग्रेसच्या तक्रारींना पाठिंबा देत आयोगाने यावर त्यांची भूमिका स्पष्ट करायलाच हवी, असे सांगितले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चवधरी, रवींद्र धंगेकर व ॲड. अभय छाजेड, गोपाल तिवारी, रफीक शेख, अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राज अंबिके, सौरभ अमराळे, प्राची दुधाने, सुंदर ओव्हाळ, सीमा सावंत, शारदा वीर, ज्योती परदेशी, द. स. पोळेकर, राजू ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. सुजित यादव यांच्या हस्ते सरोदे यांचे राज्यघटनेची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. अजित दरेकर यांनी आभार व्यक्त केले.