पत्रकारितेतील ‘न्यू नॉर्मल’साठी सतत अद्ययावत राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:17+5:302021-02-05T05:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “डिजिटल माध्यमांसाठी तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने ‘न्यू नॉर्मल’ परिस्थिती समजून घेण्यासाठी पत्रकारांनी सतत अद्ययावत ...

पत्रकारितेतील ‘न्यू नॉर्मल’साठी सतत अद्ययावत राहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “डिजिटल माध्यमांसाठी तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने ‘न्यू नॉर्मल’ परिस्थिती समजून घेण्यासाठी पत्रकारांनी सतत अद्ययावत राहण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी केले.
पत्रकार विश्वनाथ गरूड लिखित, गमभन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘डिजिटल पत्रकारिता’ (दुसरी आवृत्ती) आणि ‘डिजिटल बातम्या आणि एसईओ’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. आनंद आगाशे, प्रकाशक ल. म. कडू, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ स्वप्निल नरके यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.
आगाशे म्हणाले की, जगाबरोबर वृत्तपत्रसृष्टी, डिजिटल माध्यमे सतत बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. नवे ‘न्यू नॉर्मल’ समोर येत आहे. अशा वेळी पत्रकारांनी तंत्रस्नेही राहून सतत अद्ययावत राहिले पाहिजे. डिजिटल पत्रकारितेवर रंजक प्रकारे तांत्रिक माहिती देणारी अशा प्रकारची पुस्तके पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात असली पाहिजेत.
स्वप्निल नरके म्हणाले की, डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायजेन, सर्च इंजिन मार्केटिंग या गोष्टी येतात. प्रत्येक व्यवसायाला प्रमोशनसाठी कोणते डिजिटल तंत्र उपयोगी पडेल याचा अचूक अंदाज असला पाहिजे. मात्र, पारंपरिक माध्यमातून प्रमोशन करण्यापेक्षा डिजिटल माध्यमातून प्रमोशनद्वारे व्यवसायाची माहिती सर्वदूर पोहोचविता येण्यासाठी उपयोगी ठरते.
विश्वनाथ गरुड यांनी लेखनामागील भूमिका मांडली. ते म्हणाले की, न्यूज वेबसाईट निर्मित करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना लागते. केवळ सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करून उपयोग नसतो. ॲग्रिगेटरशी भागीदारी करणेही फायदेशीर ठरत नाही. गुगलवर वेबसाईट दिसण्यासाठी ऑप्टिमायजेशन केले पाहिजे. त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिलेली आहे. सागर गोखले यांनी सूत्रसंचालन केले. आशिष चांदोरकर यांनी आभार मानले.