Raja Dikshit | अपमान आणि अडवणुकीला कंटाळून अखेर डॉ. राजा दीक्षितांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:57 PM2023-01-12T20:57:28+5:302023-01-12T21:13:32+5:30

मंडळाच्या सचिवांकडे पत्राद्वारे राजीनामा सुपूर्द

State Marathi Encyclopaedia Production Board Dr. Raja Dixit Resignation Tired of insults and obstacles pune latest news | Raja Dikshit | अपमान आणि अडवणुकीला कंटाळून अखेर डॉ. राजा दीक्षितांचा राजीनामा

Raja Dikshit | अपमान आणि अडवणुकीला कंटाळून अखेर डॉ. राजा दीक्षितांचा राजीनामा

Next

पुणे : राज्य सरकारच्या भाषा आणि वित्त विभागाने गेल्या दीड वर्षात माझी प्रशासकीय आणि आर्थिक नाकेबंदी करुन विश्वकोशाचे काम ठप्प करण्याचा प्रयत्न केला. नोकरशहाकडून सातत्याने केली जाणारी अडवणूक व अपमानाला कंटाळून अखेर राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी मंडळाच्या सचिवांकडे पत्राद्वारे राजीनामा सुपूर्द केला आहे.

राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर सुरूवातीपासूनच ‘ज्ञानमंडळ’ व्यवस्थेत अंगभूत दोष असल्याचे आणि विश्वकोशाच्या मूळ पद्धतीशास्त्राला हरताळ फासला गेल्याचे लक्षात आल्यामुळे काही निर्णय घेऊन कामातील शिस्तीला आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले. पण, या गोष्टीचा राग धरून माझी प्रशासकीय आणि आर्थिक नाकेबंदी केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे राज्याच्या मराठी भाषा विभागाने ’मराठी तितुका मेळवावा ‘नावाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन आणि त्या संमेलनात सहभाग या दोन्ही गोष्टींपासून मला आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांना पद्धतशीरपणे दूर ठेवले.

कार्यक्रमाच्या २४ तास आधीपर्यंत आम्हा दोघांना संमेलनाचे साधे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. अशी अपमानास्पद वागणूक देऊन झाल्यावर आम्हाला सहभागी करण्याचे प्रयत्न संमेलनाच्या आदल्या दिवशी करण्यात आले. ३ जानेवारी रोजी मंत्रिमहोदयांनी रात्री अकराच्या सुमारास म्हणजे उद्घाटन समारंभाच्या सुमारे दहा तास आधी मला दूरध्वनी केला. परंतु, जे झाले होते त्या पार्श्वभूमीवर संमेलनास उपस्थित राहणे शक्यच नव्हते. हा केवळ आमच्या व्यक्तिगत मानापमानाचा प्रश्नच नाही. भाषा विभागाचा एवढा महत्त्वाचा उपक्रम आखताना दोघा अध्यक्षांना पूर्णपणे दुर्लक्षित करून आणि मराठी भाषेसंदभार्तील साधकबाधक चर्चेला प्राधान्य न देता केवळ करमणूकप्रधान आणि उत्सवी पद्धतीने उपक्रम साजरा करून उधळपट्टी करणे कितपत औचित्याला धरून आहे? घाईघाईने अनेक ‘रिकाम्या खुर्च्यां’समोर हा उत्सव साजरा करण्यापायी काही लाख रुपयांची जी उधळपट्टी करण्यात आली ती कितपत समर्थनीय आहे?. हे दोन्ही अनुभव ध्यानात घेता माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला विश्वकोश अध्यक्षपदाचे काम सुरू ठेवणे अशक्य आहे, असे दीक्षित यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन बंद ठेवला होता.

हा लहरी खटाटोप कशासाठी?

भाषा विभागातील या दोन्ही मंडळांना त्यांच्या वाढत्या कार्यासाठीची जादा तरतूद देण्याबाबत पूर्ण हात आखडता घेणा-या शासनाने कोणत्या अट्टाहासातून हा खर्च केला, हे अनाकलनीय आहे. भाषा धोरण जाहीर करण्यासारख्या गोष्टींना बगल देऊन आणि महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागांवर अन्याय करून हा लहरी खटाटोप कशासाठी?, असा प्रश्न दीक्षित यांनी उपस्थित केला आहे.

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सचिवांना राजीनामा पाठविल्यावर भाषा मंत्री यांचा मला फोन आला. त्यांनी राजीनामा देऊ नका असे सांगितले आहे. मी उद्या (दि.13)पर्यंत वाट बघणार आहे. त्यानंतर ठोस काहीतरी निर्णय घेईन

- डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

 

Web Title: State Marathi Encyclopaedia Production Board Dr. Raja Dixit Resignation Tired of insults and obstacles pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.