राज्य सहकारी बँकेने केला रुपी बँक विलीनीकरणाचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:11 IST2021-04-28T04:11:10+5:302021-04-28T04:11:10+5:30
विशाल शिर्के : पिंपरी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रुपी को ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणाचा ठराव करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ...

राज्य सहकारी बँकेने केला रुपी बँक विलीनीकरणाचा ठराव
विशाल शिर्के : पिंपरी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रुपी को ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणाचा ठराव करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविला आहे. रुपी विलीनीकरणबाबत राज्य बँकेने सर्व आवश्यक बाबी पूर्ण केल्या आहेत. आता आरबीआयच्या निर्णयावर रुपी बँकेचे विलीनीकरण अवलंबून आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे फेब्रुवारी २०१३ मध्ये रुपी बँकेवर निर्बंध घातले आहेत. रुपी बँक शंभरी पार केलेली सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक मानली जाते. पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी, ठाणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे बँकेच्या ३५ हून अधिक शाखा आहेत. निर्बंधांमुळे गेल्या आठ वर्षांपासून सुमारे पाच लाख खातेदार आणि ठेवीदारांची तेराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत.
सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक असल्याने राज्य सहकारी बँकेने रुपी बँकेच्या विलीनीकरणाची तयारी दर्शविली. त्यासाठी आर्थिक पडताळणी अहवाल तयार केला. सहकार आयुक्तांमार्फत आरबीआयला प्रस्ताव पाठविला. आरबीआयच्या सूचनेनुसार राज्य बँकेने वार्षिक सर्वसाधारण सभेत रुपी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विलीनीकरणाचा ठराव केला. या ठरावाची माहिती १७ एप्रिल २०२१रोजी आरबीआयला पाठविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य बँकेने आरबीआयच्या म्हणण्यानुसार सर्व तांत्रिक आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे रुपीच्या विलीनीकरणाचा निर्णय आरबीआयवर अवलंबून आहे.
. रुपी बँक विलीनीकरण प्रस्ताव आरबीआयला सादर करून जवळपास दोन वर्षे झाली आहेत. या काळात आरबीआयने एकदाही रुपी अथवा राज्य बँकेस चर्चेस बोलावले नाही. अगदी नागरी बँक विलीनीकरण करून घेण्यासाठी राज्य बँकेच्या उपविधित बदल करण्यात आला. राज्य बँकेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत विलीनीकरण ठराव करण्यात आला. राज्य बँकेने आरबीआयच्या म्हणण्यानुसार सर्व तांत्रिक आणि कागदोपत्री बाबींची पूर्तता केली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी आरबीआयची आहे.
-विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, प्रशासकीय मंडळ
राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्यास काही अडचण असल्यास आरबीआयने तसे स्पष्ट करावे. तसेच रुपी बँकेच्या पुनरुज्जीवनास परवानगी द्यावी, अशी मागणी आरबीआयकडे केली आहे. अर्थात त्यासाठी देखील आम्हाला खातेदार-ठेवीदारांच्या सहकार्याची गरज आहे.
सुधीर पंडित, प्रशासक, रुपी को ऑपरेटिव्ह बँक
------
रुपी बँकेची स्थिती
रुपी बँक शाखा ३५, मालकीच्या जागा ९,
ठेवी १२९३ कोटी
खातेदार ४.९१ लाख