स्वरयज्ञास प्रारंभ

By Admin | Updated: February 6, 2016 01:48 IST2016-02-06T01:48:31+5:302016-02-06T01:48:31+5:30

लालगुडी विजयालक्ष्मी यांच्या व्हायोलिनमधील कर्नाटकी संगीताचे ‘अभिजात’ सूर, पं. व्यंकटेशकुमार यांची भारदस्त गायकी आणि उस्ताद अमजद अली खाँ यांचे मनमोहक सरोदवादन अशा

Start Swell | स्वरयज्ञास प्रारंभ

स्वरयज्ञास प्रारंभ

पुणे : लालगुडी विजयालक्ष्मी यांच्या व्हायोलिनमधील कर्नाटकी संगीताचे ‘अभिजात’ सूर, पं. व्यंकटेशकुमार यांची भारदस्त गायकी आणि उस्ताद अमजद अली खाँ यांचे मनमोहक सरोदवादन अशा स्वर, लय आणि तालाच्या अद्वितीय संयोगातून साकार झालेल्या ‘स्वरमयी’ मैफलीने रसिकांची सांज संस्मरणीय केली.
निमित्त होते नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित ‘गानसरस्वती’ महोत्सवाचे. राघवेंद्र स्वामी मठाचे पं. वेणुगोपाल आचार्य यांच्या हस्ते मंत्रपठणाचा जागर करून तीन दिवसीय ‘स्वरयज्ञा’स हजारो रसिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रारंभ झाला. पूर्वार्धात लालगुडी विजयालक्ष्मी यांच्या कर्नाटकी शैलीमधील व्हायोलिनच्या सुरांनी रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडत ‘सुरेल’ वातावरणनिर्मिती केली. साथीला असलेल्या जे. वैद्यनाथन यांचा पखवाज आणि के. व्ही. गोपालकृष्णन यांच्या खांजरा या वाद्याच्या जुगलबंदीने तालांच्या ‘नादा’ची गोडी रसिकांनी अनुभवली.
त्यानंतर पं. व्यंकटेशकुमार यांच्या भारदस्त गायकीने स्वरांची गुंफण करीत बंदिशींची अद्वितीय मालिका सादर केली. छायानट रागातील ‘येरी अवगुंद लावो’ आणि झनझनन बाजे बिछुवाँ या रचना आणि शंकरा रागामधील ‘येरी सजनी’ आणि ‘सो मोरे लाल’ या बंदिशींंमधून रागांचे सौंदर्य त्यांनी खुलविले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचे मंचावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सरोदच्या मंजूळ झंकाराने उत्तरार्धात त्यांनी अनोखे रंग भरले. शुद्ध कल्याणमधील रचना आणि गणेश कल्याणमधील एकतालातील बंदिश सादर करून रसिकांना परमोच्च आनंदाची अनुभूती त्यांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Start Swell