पोलीस ठाण्यावर ठिय्या
By Admin | Updated: August 13, 2015 04:36 IST2015-08-13T04:36:18+5:302015-08-13T04:36:18+5:30
पोलीस कोठडीत मारहाणीतच अजय भोसले या आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत बुधवारी त्याच्या नातेवाइकांनी खेड पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या मारला.

पोलीस ठाण्यावर ठिय्या
राजगुरूनगर : पोलीस कोठडीत मारहाणीतच अजय भोसले या आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत बुधवारी त्याच्या नातेवाइकांनी खेड पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या मारला. मारहाणीस कारणीभूत पोलिसांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.
या घटनेमुळे आज दिवसभर खेड पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण होते. पोलिसांची जादा कुमक मागवून मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता. भोसले याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला आणि पोलिसांनी पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप मृताची पत्नी व बहिणीने केला. त्यामुळे दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. या नातेवाइकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ससून येथेच असलेल्या मृताचे विच्छेदन दुपारपर्यंत झाले नव्हते. अखेर अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नातेवाईक मृताच्या विच्छेदनास तयार झाले.
पोलीस अधिकारी मात्र भोसले याच्या पोटात दुखत असल्यामुळे त्याला आम्ही रुग्णालयात नेले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत होते. आरोपीला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही, उलट त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आम्ही तीनही दिवस त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे, असा दावा पोलीस करीत आहेत. काल दुपारी त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला चांडोली रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात यावे, असे सांगितल्यावरून त्याला पुढे हलविण्यात आले. पण तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्यास पोलिसांकडून सीआयडीकडे तपास वर्ग करण्यात येतो. त्याप्रमाणे आज सकाळी पुणे सीआयडीच्या पोलीस अधीक्षक पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दिवसभर येथे तणावपूर्ण वातावरण होते. आळेफाट्यापासून चाकणपर्यंतचे पोलीस तैनात करण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर नातेवाईक अंत्यविधीसाठी तयार झाले. पण रात्री उशिरापर्यंत मृतदेह राजगुरुनगरला आला नव्हता. (वार्ताहर)
‘‘या घटनेत सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारींची चौकशी केली जाईल. पुढील तपास सीआयडीकडून केला जाणार आहे. त्यामुळे या तपासात पोलिसांचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही.’’
तानाजी संभाजी चिखले, अपर पोलीस अधीक्षक