‘बोलक्या अंगणवाड्यां’ची राज्यपातळीवर दखल
By Admin | Updated: August 14, 2015 03:21 IST2015-08-14T03:21:24+5:302015-08-14T03:21:24+5:30
तब्बल १० वर्षांनंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज समितीचे सदस्य जिल्ह्यातील बोलक्या अंगणवाड्या पाहून भारावले

‘बोलक्या अंगणवाड्यां’ची राज्यपातळीवर दखल
पुणे : तब्बल १० वर्षांनंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज समितीचे सदस्य जिल्ह्यातील बोलक्या अंगणवाड्या पाहून भारावले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक तर केलेच; शिवाय राज्यात हा उपक्रम मॉडेल म्हणून राबविण्यासाठी विधिमंडळाला सूचना करू, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
१० आॅगस्टपासून ही समिती ४ दिवसांच्या दौऱ्यावर २० आमदारांची टीम जिल्ह्यात आली होती. आज (दि. १३) त्यांनी त्यांचे कामकाज उरकून निरोप घेतला. या भेटीमुळे अधिकाऱ्यांना धडकी भरली होती. समितीपुढे हजर होताना गृहपाठ पक्का करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह लिपिकापर्यंत प्रत्येक जण कामाला लागला होता.
सन २००८-०९ आणि सन २०११-१२ या वर्षांतील लेखापरीक्षण अहवाल आणि सन २०१२-१३ या वर्षातील वार्षिक प्रशासन अहवाल तपासला. पहिल्या दिवशी १० आॅगस्ट ते ११ आॅगस्टच्या दुपारपर्यंत अहवाल तपासणी करून दोन-तीन आमदारांची टीम तयार करून तालुका दौरा
केला. या टीमने तेराही पंचायत समित्यांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.
तसेच जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,
पाणी व स्वच्छता, घरकुल योजना येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा
घेतला. आज सकाळी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक
घेऊन चांगल्या कामांचे कौतुक व जिथे दोष आढळले त्याबाबत जाब विचारला.
या समितीने सुरुवातीला ‘आम्ही येथे कोणावर कारवाई करण्यास आलेलो नाही. प्रशासकीय कामाला शिस्त व गती मिळावी, हा आमचा उद्देश आहे,’ असे स्पष्ट केले होते. कामकाजाचा कालावधी ६ तासांचा ठरला असतानाही त्यांनी १२ ते १५ तास काम करून तेराही तालुक्यांना भेट दिली.
ज्या ठिकाणी यापूर्वीच्या समीतीने अनेक वर्षे भेट दिली नाही ते जिल्हे प्राधान्यक्रमाने घेऊन दर महिन्यात दोन जिल्हे होतील, असे या कमिटीचे नियोजन आहे. या भेटीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नक्कीच गती मिळेल.
या भेटीबाबात काही अधिकाऱ्यांनी अशा भेटी नियमित झाल्या, तर प्रशासकीय कामकाजाला नक्कीच शिस्त लागेल व कामात गती येईल, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)