स्मरणिकेतून उलगडणार भाषासंस्कृतीचे अनुबंध; बडोदा साहित्य संमेलनात होणार प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:55 AM2018-01-10T11:55:59+5:302018-01-10T11:58:47+5:30

महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे.

souvenir publication in Baroda marathi sahitya samelan | स्मरणिकेतून उलगडणार भाषासंस्कृतीचे अनुबंध; बडोदा साहित्य संमेलनात होणार प्रकाशन

स्मरणिकेतून उलगडणार भाषासंस्कृतीचे अनुबंध; बडोदा साहित्य संमेलनात होणार प्रकाशन

Next
ठळक मुद्देस्मरणिकेच्या ३,००० हून अधिक प्रतींची केली जाणार छपाई गुजरातमधील साहित्य परंपरा आणि मराठी अनुवाद आदी विषयांवर टाकण्यात आला प्रकाश

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. बडोदा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी या अनोख्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. स्मरणिका मराठीमध्ये प्रकाशित होणार असून, गुजराथी भाषेत तिचा अनुवाद करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेल्या बडोदानगरीत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन म्हटले, की स्मरणिकेबाबत उत्सुकता असतेच. विविध लेखांनी माहितीपूर्ण अशी स्मरणिका साहित्यरसिकांच्या आवडीचा विषय असतो. यंदाच्या संमेलनात प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चंद्रशेखर अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या समितीने स्मरणिकेतील लेखांचे संकलन केले असून, उषा तांबे या समितीच्या मार्गदर्शक आहेत. स्मरणिकेच्या ३,००० हून अधिक प्रतींची छपाई केली जाणार आहे.
स्मरणिकेमध्ये बडोद्यातील साहित्यिकांचे लेखक, गुजरातमधील साहित्य परंपरा, गुजराती साहित्य आणि मराठी अनुवाद आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
मृणालिनी कामत, चंद्रकांत नाशिककर, क्रिश्मा करोगल, डॉ. धनंजय मुजुमदार, जयश्री जोशी, सुषमा लेले आदी लेखकांनी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विविध पैलूंवर आपल्या लेखनातून भाष्य केले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला समृद्ध साहित्यिक वारसा लाभला आहे. 

१६ फेब्रुवारीला स्मरणिकेचे प्रकाशन
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी, १६ फेब्रुवारी रोजी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाला उपस्थित राहावे, यासाठी आयोजक संस्था उत्सुक आहे. 
या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते रघुवीर चौधरी, गुजराथी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सीतांशू यशश्चंद्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये १९२१मध्ये बडोद्याला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. नरहर चिंतामणी केळकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे १९३२ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या संमेलनाचे सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते. न. चिं. केळकर आणि सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षीय भाषणांचा समावेश स्मरणिकेमध्ये करावा, अशी सूचना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अनुबंध दोन राज्यांनी पूर्वीपासून वृद्धिंगत केले आहेत. 
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी तेथील साहित्य-संस्कृतीला चालना देत दूरदृष्टीने काम केले. 
या समृद्ध इतिहासाची झलक स्मरणिकेत पाहायला मिळणार असल्याची माहिती मराठी 
वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: souvenir publication in Baroda marathi sahitya samelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.