ज्वारीची पेरणीही यंदा कमीच
By Admin | Updated: October 27, 2015 00:54 IST2015-10-27T00:54:18+5:302015-10-27T00:54:18+5:30
खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे.

ज्वारीची पेरणीही यंदा कमीच
पुणे : खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे.
यंदा जिल्ह्यात फक्त ८६ टक्के पाऊस झाला आहे. त्यातून जूनची सरासरी ओलांडून पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात
तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे.
भातपिक वगळता सर्वच पिके वाया गेली; मात्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या महिन्यात सरासरी १४६.०४ मिलिमीटर पाऊस पडतो. तो १८०.७७ मिलिमीटर म्हणजे टक्केवारीत तो १२३.७८ इतका झाला. यामुळे रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळाला.
रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ते ४ लाख ३१ हजार ८०० हेक्टरवर घेतले जाते. गेल्या वर्षी ३२ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा आजपर्यंत १ लाख १२ हजार ४०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून ती २६ टक्के इतकी आहे. यापुढे ज्वारीचे पेरणी होणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही यंदा कमीच क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे.
त्यात अजून परतीच्या एका पावसाची या पिकासाठी गरज आहे. तो झाला नाही तर हे पीकही हाताला लागणार नाही. बारामती, पुरंदर, आंबेगाव परिसरात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
गव्हाच्या
0 टक्के पेरण्या
जिल्ह्यात रब्बी हंगामात ६५ हजार ४00 हेक्टरवर गहू पीक घेतले जाते. मात्र अद्याप या पिकाच्या 0 टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार
स्पष्ट झाले आहे. यापुढील काळातही शेतकरी पाणी नसल्याने पीक घेईल का नाही याची शाश्वती नाही.
आॅक्टोबर संपला तरी जिल्ह्यात १८ टँकरने १२ गावे ७९ वाड्या-वस्त्यांवर ३८ हजार २१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक ८ टँकर इंदापूर तालुक्यात सुरू असून, त्यानंतर बारामतीत ५, पुरंदरला
४ व दौंड तालुक्यात १ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी या महिन्यात फक्त तीन टँकरने तोही बारामतीत पाणीपुरवठा सुरू होता.