नरगपरिषदेचे ढिसाळ नियोजन नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:22+5:302021-08-23T04:14:22+5:30
दौंड : येथील नरगपरिषदेतील आरोग्य विभागाने गेली अकरा महिने कचरा उलणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा केले नाही. त्यामुळे काही दिवसांपासून ...

नरगपरिषदेचे ढिसाळ नियोजन नागरिकांच्या जीवावर
दौंड : येथील नरगपरिषदेतील आरोग्य विभागाने गेली अकरा महिने कचरा उलणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा केले नाही. त्यामुळे काही दिवसांपासून कचरा उचलणे बंद झाल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून लागले आहे. दरम्यान, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरू लागली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दौंड नगरपरिषदेतील आरोग्य विभागाने गेल्या आठ महिन्यांपासून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले नाही. परिणामी शहरातील कचरा उचलण्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. येथील गोपाळवाडी रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यालगतच कचराकुंडी आहे. या कचराकुंडीवर मोठ्या प्रमाणात कचरा साचून आहे. तेव्हा येथील साठलेल्या कचऱ्याची परिस्थिती पाहता कचरा डेपो? की कचराकुंडी हेच समजत नाही. या ठिकाणी कचराकुंडीत गाद्या, उश्या, सुका-ओला कचरा असल्याने दुर्गंधी अधिकच पसरत आहे. जनावरांचा देखील संचार वाढला असून नागरिकांना याचा त्रास होत आहे.
नगरपरिषदेत इतर ठेकेदारांचे बिल तातडीने काढले जातात अशाच पद्धतीने आरोग्य विभागाने ठेकेदाराचे बिल वेळीच काढले असते तर शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहण्याची नामुष्की आली नसती. चौदाव्या वित्त आयोगातून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचे बिल जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेला अदा करावे लागत असल्याचे समजते. त्यानुसार ठेकेदाराच्या बिलासंदर्भातील प्रस्ताव गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा प्रस्ताव वेळीच पाठवला असता तर शहरात कचरा साचून राहण्याची वेळ आली नसती.
मुख्याधिकाऱ्याविना नगरपरिषद सुरू
गेल्या काही दिवसांपासून दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रजेवर केले आहेत. या दोन महिने झाले असून पुढील सहा महिनेही ते रजेवर असल्याचे समजते. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे आहे. महसूली कामामुळे त्यांनाही नगरपरिषदेचे कामकाज पाहण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२२ दौंड
दौंड गोपाळवाडी रोडलगत राज्य राखीव पोलीस बलाच्या जागेत साचलेला कचरा.