सहा वर्षांपासून रखडला उड्डाणपूल

By Admin | Updated: February 11, 2016 03:11 IST2016-02-11T03:11:04+5:302016-02-11T03:11:04+5:30

नदी, महामार्ग आणि रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या प्रकल्प उभारणीचे काम २००९ला सुरू झाले. आॅक्टोबर २०१३ला प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना

Six years old flyovers | सहा वर्षांपासून रखडला उड्डाणपूल

सहा वर्षांपासून रखडला उड्डाणपूल

- संजय माने, पिंपरी
नदी, महामार्ग आणि रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या प्रकल्प उभारणीचे काम २००९ला सुरू झाले. आॅक्टोबर २०१३ला प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना २०१६ वर्ष आले, तरी प्रकल्प अर्धवट आहे. तब्बल सात वर्षे प्रकल्पाचे काम सुरू असून, जुलै २०१६ला प्रकल्प पूर्ण होईल, असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहेत. अवघ्या १.६ किलोमीटर लांबीच्या ९९ कोटींच्या खर्चाच्या या उड्डाणपूल प्रकल्पावर आत्तापर्यंत ६५ कोटींचा खर्च झाला आहे.

काळेवाडी फाटा-देहू-आळंदी बीआरटी रस्त्याला जोडणारा एम्पायर इस्टेटचा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. एम्पायर इस्टेट या गृहप्रकल्पाच्या जवळून उड्डाणपूल जाणार असल्याने रहिवाशांनी विरोध केला होता. वाहनांची वर्दळ वाढल्यास ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार, असे रहिवाशांचे म्हणणे होते. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी पॉलिकार्बोनेटचे सीट लावून उपाययोजना करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी अधिकचे १५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने दाखवली. त्यानंतर रहिवाशांचा विरोध मावळला. प्रकल्पाचे काम सुरू झाले. गॅमन इंडिया या कंत्राटदारास ३० महिन्यांची मुदत देण्यात आली. काम अत्यंत संथ गतीने सुरू झाले. आॅक्टोबर २०१३मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ ३० टक्के काम झाले. त्यामुळे शहरातील नागरिक, तसेच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. काही पदाधिकारी, नगरसेवकांनी तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
सुरुवातीपासून प्रकल्पाला विरोध होत असताना, अन्य अडचणी येऊ लागल्या. काम रेंगाळल्याने कंत्राटदारापुढे आर्थिक अडचणही निर्माण झाली. दरम्यानच्या काळात दुसरा कंत्राटदार नेमून काम करता येईल का, असा विचारही पुढे आला. दुसरा कंत्राटदार नेमला जाऊ शकेल, हे लक्षात येताच कंत्राटदाराने लवादाकडे धाव घेतली. लवादात गेल्यानंतर कामाची गती आणखी मंदावली. दुसरा कंत्राटदार नेमल्यास प्रकल्पाच्या कामात आणखी कायदेशीर अडचणी निर्माण होतील, हे लक्षात घेऊन महापालिकेने दुसरा कंत्राटदार नेमण्याच्या हालचाली बंद केल्या. लवादासाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकांच्या माध्यमातून महापालिका आणि प्रकल्पाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा तोडगा काढण्यात आला. तोपर्यंत २०१४ वर्ष आले होते. त्यानंतर रखडलेले काम पुन्हा सुरू झाले.

अडथळ्यांची शर्यत : उदासीनता कारणीभूत
एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे रेंगाळलेले काम पूर्ण झाले. कामाला गती आली असताना काही नगरसेवक कंत्राटदाराकडे पैैशांची मागणी करत असल्याच्या प्रकाराची चर्चा सुरू झाली. कंत्राटदाराने कोठेही कोणाच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. परंतु, ठेकेदाराची अडवणूक करणारे नगरसेवक कोण, याबद्दलची उत्सुकता वाढली होती. असेच प्रकार सुरू राहिल्यास सुरू झालेल्या प्रकल्पाच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, या प्रकारावर पडदा पडला. काम विनाव्यत्यय सुरू झाले आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के काम पूर्णत्वास जाण्यास आणखी सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.

Web Title: Six years old flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.