वराळ खूनप्रकरणातील ६ आरोपींना अटक
By Admin | Updated: January 29, 2017 03:52 IST2017-01-29T03:52:28+5:302017-01-29T03:52:28+5:30
निघोज (ता. पारनेर) येथील माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ यांच्या खून प्रकारणाच्या तपासाला गती मिळाली असून, शार्पशूटर नागेश

वराळ खूनप्रकरणातील ६ आरोपींना अटक
टाकळी हाजी : निघोज (ता. पारनेर) येथील माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ यांच्या खून प्रकारणाच्या तपासाला गती मिळाली असून, शार्पशूटर नागेश लोखंडे (लोणी आंबेगाव) याला शुक्रवारी अटक केल्यानंतर, लगेचच शनिवारी सकाळी उस्मानाबाद येथे तुरीच्या शेतात लपलेल्या सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. त्यांनी वराळ यांच्या खुनाची कबुली दिल्याने या खून कटप्रकरणाचा उलगडा होणार आहे.
विकी ऊर्फ विकास आनंदा रसाळ, राहुल रामदास साबळे, अक्षय झुंबर लुडे, ऋषिकेश सुभाष भोसले, प्रसाद बाबूराव गिरी या सहा आरोपींना उस्मानाबाद येथून शनिवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. शनिवार, (दि. २१) दुपारी २ वाजता निघोजच्या बसस्थानक परिसरात वराळ यांचा निर्घृन खून करण्यात आला. त्यानंतर निघोज व परिसरात स्वयंघोषित बंद पाळण्यात आला. वराळ यांचे चुलते रंगनाथ वराळ यांनी पारनेर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानंतर या खुनाचा कट रचणारे दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते बबन कवाद, निघोज फलोद्यान संस्थेचा उपाध्यक्ष व ठेकेदार अमृत रसाळ, जीवनरेखा हॉस्पिटल चालविणारा डॉ. महेंद्र झावरे, संदीप लंके, मुक्तार शामीर इनामदार, कुख्यात गुन्हेगार प्रवीण रसाळ याचा भाऊ ज्ञानदेव आनंदा रसाळ यांना पोलिसांनी गुन्हा घडल्याच्या दिवशी मध्यरात्री अटक केली. त्यांना पारनेर न्यायालयात उभे केल्यानंतर ५ दिवसांची कोठडी मिळाली. ती कोठडी संपल्यानंतर, पुन्हा दि. ३ फेब्रुवारीपर्यंत आठ दिवसांची कोठडी देण्यात आली. याच दरम्यान या गुन्ह्यातील ७ आरोपी पकडल्याने एकत्रित आरोपींची संख्या १३ झाली आहे. मात्र, अद्याप या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ व कटात सहभागी असलेला माजी उपसभापती खंडू भुकन अद्याप फरारी आहे.
- याप्रकरणी पंचवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. अद्याप १२ जण फरार आहेत. यामध्ये विकी रसाळ याचीही मुख्य भूमिका आहे. त्याला उस्मानाबाद (बेबळे) येथे शनिवारी (दि. २८) ५ साथीदारांसहित अटक केल्याने तपासाला वेग येणार आहे.