पुणे : पुण्यात जीबीएस बाधितांची संख्या वाढत असली तरी हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच या आजारांवर लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी साेमवारी ऑनलाइन बैठकीत दिली. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्रचेआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यात ज्या ठिकाणी जीबीएस रुग्णसंख्या वाढत आहेत, त्या भागात प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, कुक्कुटपालन व्यावसाय असलेल्या परिसराला भेटी द्याव्यात. पाणीपुरवठा आणि शुद्धिकरण विभागाने विशेष जलशुद्धिकरण मोहीम राबवावी. ज्या ठिकाणी पाइपलाइन दुरुस्तीची गरज असेल, तिथे ती तत्काळ करण्यात यावी, तसेच मागील दोन महिन्यांतील पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक बाबींचा आढावा घ्यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या एसओपीचे पालन करावे, असे सांगत रुग्णांना फिजिओथेरपीसह मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ला देण्याच्या सूचनाही नड्डा यांनी दिला.
बैठकीबद्दल माहिती देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यातील जीबीएस रुग्णांबाबतची इत्यंभूत माहिती आम्ही केंद्र सरकारला दिली आहे. राज्यातील जीबीएस परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून, पुणे महापालिका आणि राज्य सरकार समन्वय साधून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत.