भावाला किडनी देऊन बहिणीचे रक्षाबंधन!
By Admin | Updated: September 2, 2015 04:07 IST2015-09-02T04:07:23+5:302015-09-02T04:07:23+5:30
बहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधन साजरे करताना बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. परंतु, चक्क जिवाची पर्वा न करता आपल्या भावाला आपली किडनी देणाऱ्या बहिणीने नात्याचा

भावाला किडनी देऊन बहिणीचे रक्षाबंधन!
अशोक खरात, खोडद
बहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधन साजरे करताना बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. परंतु, चक्क जिवाची पर्वा न करता आपल्या भावाला आपली किडनी देणाऱ्या बहिणीने नात्याचा सुरेख आदर्श तरुणाईसमोर उभा केला आहे. ही बहीण आहे योगिता फापाळे. जुन्नरमधील येडगावची! बहिणीने भावाला दिलेली ही खऱ्या अर्थाने अनमोल भेट ठरली आहे.
योगिताने तिच्या लहान भावाला आपली किडनी बहाल केली. त्यामुळे ती सगळीकडे कौतुकास पात्र ठरत आहे. येडगावमध्ये राहणाऱ्या यादव हांडे यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलींची लग्ने झाली. तुषारला वयाच्या २१व्या वर्षापासून किडनीची तक्रार सुरू झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला लहानपणापासून एक किडनीच नव्हती. एका किडनीवर तो व्यवस्थित जगत होता. पण, २१व्या वर्षानंतर त्याच्या दुसऱ्या किडनीलाही त्रास सुरू झाला व ती फेल होत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. सुरुवातीला आयुर्वेदिक उपचार करून त्यानंतर डायलिसिस करण्यात ४-५ वर्षे गेली. त्यानंतर मात्र त्याला आता ताबडतोब किडनीची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. इतक्या कमी कालावधीत डोनर मिळणे अवघड होते. त्यांनी शोधही घेतला; पण व्यर्थ! घरातील लोकांची तपासणी केली, तेव्हा फक्त वडील आणि योगिता यांचीच किडनी जुळली. पण वडिलांची एक किडनी आधीच खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे फक्त योगिताचा शेवटचा पर्याय उरला. योगिता विवाहित होती, त्यामुळे तिच्या घरच्यांची अनुमतीदेखील आवश्यक होती. योगिताला सात वर्षांची एक लहान मुलगी आहे. योगिता पुण्यात नोकरी करते. भावासाठी हा त्याग करण्याचे तिने ठरवले. घरच्यांचीही परवानगी मिळवली आणि दोन महिन्यांची रजा टाकली.
दरम्यानच्या काळात गर्भपिशवी काढण्याचे एक आॅपरेशनही तिला करावे लागले. सारे ताणात असताना योगिता मात्र हसतमुख राहून सामोरी गेली आणि आपली एक किडनी भावासाठी दिली. आपल्यामुळे भावाचा जीव वाचला याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होते.