पिंपरी : महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गाला अडथळा असलेल्या आयुक्त बंगल्याशेजारील दोन औद्योगिक मालमत्तांचे बांधकाम पाडले. मात्र, तेही अर्धवट पाडले असून तेथे राडारोडा तसाच पडून आहे. महिना उलटून गेला तरी अद्यापही बीआरटी मार्गाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आणखी दोन ते तीन महिने या बीआरटी मार्गावरून बस धावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.प्रवाशांना जलद सेवा देता यावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सहा बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) प्रकल्प उभारले आहेत. त्यातील काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा मार्ग वगळता इतर सर्व बीआरटी मार्ग तयार असून यावर बससेवा सुरू आहे.आयुक्त बंगल्याशेजारील ३,५०० चौरस मीटर भूसंपादन रखडल्यामुळे गेल्या चौदा वर्षांपासून काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्ग रखडला होता. अखेर या जागेचा तिढा सुटला असून, येथील दोन कंपन्यांना महापालिकेने एमआयडीसीमधील डी२ ब्लॉक, केएसबी चौक येथे पर्यायी जागा दिली. त्यानंतर मागील महिन्यात येथील बांधकाम पाडण्यास सुरुवात केली.एक महिना उलटून गेला तरी अजूनही येथील बांधकाम पूर्ण पाडलेले नाही. तसेच राडारोडाही तसाच पडून आहे. त्यामुळे अजूनही रखडलेल्या बीआरटी मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा झालेला नाही. हे काम कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. असा आहे मार्ग- काळेवाडी फाटा ते चिखलीपर्यंत लांबी १०.२५ किलोमीटर- मार्गावर एकूण ११ बसथांबे- पूर्णानगर चौकापासून देहू-आळंदी रस्त्यापर्यंत बीआरटी मार्ग नाहीहे आहेत बीआरटी मार्गनिगडी-दापोडी, औंध-सांगवी फाटा- रावेत-किवळे, नाशिक फाटा-वाकड, दिघी-आळंदी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) आणि निगडीतील भक्ती-शक्ती चौक-मुकाई चौक किवळे या मार्गांचा समावेश आहे.
साहेब, बांधकाम पाडले; बीआरटी रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:41 IST