साहेब, चिंता करू नका, तुमचीच हवा आहे, अहो आम्ही तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:43+5:302021-01-13T04:27:43+5:30
जिल्ह्यातील ५४ गावात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचत आहे. निवडणूक म्हटली की श्रीमंत असो वा गरीब सर्वांचीच चंगळ असते ...

साहेब, चिंता करू नका, तुमचीच हवा आहे, अहो आम्ही तर
जिल्ह्यातील ५४ गावात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचत आहे. निवडणूक म्हटली की श्रीमंत असो वा गरीब सर्वांचीच चंगळ असते उमेदवारही कसलीच कुचराई न करता मतदान होईपर्यंत कार्यकर्ते व मतदारांचे लाड पुरविण्यात मग्न झाले आहेत. अर्ज दाखल केलेनंतर प्रभागांतील जनता, कार्यकर्ते यांना सांभाळून त्यांची मर्जी राखणे जिकरीचे काम मोठया शिताफीने करावे लागते. त्यासाठी उमेदवाराच्या नाकीनऊ येते. केवळ मताचे दान आपल्या पारड्यात पडावे म्हणून हे सारे सहन करून मतदारांना खूश करण्यासाठी वाटेल ते केले जात आहे. तेव्हाच कुठे मतदार आपली खरी ओळख देत आहेत. या निवडणूकीत स्थानिक नेत्यांनी प्रभागासमवेेत गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बहुतांश नागरिकांतून केला जात आहे. याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मिडीया व वर्तमानपत्र यामुळे निवडणूक आणि मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. उमेदवार मात्र अद्यापही कार्यकर्त्यांची जुळवा - जुळव करताना दिसत आहेत. निवडणुकीत होणारा खर्चही सामान्यांचा आवाक्याबाहेरचा आहे. अशा व इतर अनेक राजकीय चर्चेला सध्या ग्रामीण भागात उधाण आले आहे.
मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या नाही तर मतदार आपल्याला मतदान करणार नाही. आणी आपण घराचा दरवाजा ठोठावला तर नाराजीला सामोरे जावे लागेल, मग ते आपल्याला मतदान करतील का ? अशा द्विधा मनस्थितीत प्रचारक व उमेदवार सापडले आहेत. सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका येत असतात. त्यामुळे नेमेची येतो दारी उमेदवार' याप्रमाणे विचार करून आता मतदारराजाने आमचे मतदान तुम्हालाच पण वारंवार येवून त्रास देऊ नका असाच उपरोधिक टोला या गळ्यात पडणा-या प्रचारकांना दिल्याचे दिसून येते. 'भावनाआ को समझो' म्हणत निदान दुपारच्या प्रहरी तरी वामकुक्षी घेऊ द्या, काही वेळ उसंत घेऊ द्या असे मतदार म्हणत असताना दिसत आहेत.
चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरवात झाली असून पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी तर काही मोठ्या गावात चौरंगी सामना होत असल्याने उत्सुकता वाढली आहे.