थेट सरपंच निवडीने ग्रामविकासाला मिळणार चालना
By Admin | Updated: July 4, 2017 03:35 IST2017-07-04T03:35:56+5:302017-07-04T03:35:56+5:30
सरपंचांची निवड थेट जनतेतून होण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल अशी भावना जिल्ह्यातील विविध स्तरातील

थेट सरपंच निवडीने ग्रामविकासाला मिळणार चालना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरपंचांची निवड थेट जनतेतून होण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल अशी भावना जिल्ह्यातील विविध स्तरातील राजकीय नेते, सरपंच-माजी सरपंच यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्षांप्रमाणेच सरपंचांचीही निवड आता थेट लोकांमधून होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाने आज या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्याच्या राजकारणात पंचायत समितीमध्ये महत्त्वाचे पद असल्याने त्याभोवती राजकारण फिरत असते. अशा सरपंचपदासंबंधात निर्णय झाल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यामध्येही उमटले. काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत झाले तर काही ठिकाणी या निर्णयावर टीकाही होत आहे. ‘लोकमत’ने जिल्ह्यातील प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी व गावागावांमध्ये संपर्क साधून मतमतांतराचा कानोसा घेतला.
शिरुर, खेड, बारामती, इंदापूर, जुन्नर, भोर, हवेली, दौंड आदी महत्त्वाच्या सर्व तालुक्यांमधून या महत्त्वाच्या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या. बहुतेकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे.
या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार असून, नागरिकांना त्यांच्या अपेक्षित कार्यकर्त्याला सरपंच म्हणून थेट विराजमान करता येईल, अशी प्रतिक्रिया काही सरपंचांनी व्यक्त केली. सरपंचपदासाठी होणारे लॉबिंगदेखील आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवडणुकीसाठी असलेली ७ वी पासची अट ही जास्त असायला हवी होती अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सध्या सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवडून आल्यानंतर, सरपंच होण्यासाठी पुन्हा लॉबिंग करावे लागत आहे; पण आता सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने स्वच्छ चारित्र्याचा व विकासाचे ध्येय असणारा सरपंच होणार असल्याने गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. सरपंचाला आता विकासकामे करता येतील, असे मत डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्य जनतेतून सरपंचपद निवडणे हा चांगला निर्णय आहे. निवडणुकीनंतर सदस्य पळवापळवी थांबून अर्थकारण संपून सामान्य जनतेतून सरपंच होईल. सर्वच निवडणुका या पद्धतीने झाल्यास सामान्य जनतेतून नेता तयार होईल.
- अशोक पवार, माजी आमदार (शिरूर, हवेली)
लोकमताने गावाने सरपंच निवडून दिलेल्या उमेदवाराने इतर सदस्यांच्या बहुमताने मताने गावच्या विकासकामांचे निर्णय घेणे बंधनकारक असावे. सरपंच पदाचा उमेदवार दहावी पास असल्यास गावचा विकास, नियोजन करता येईल.
- कांचन शिंदे,
मा. सरपंच, निघोजे
गावात एकी राहील
सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यापूर्वी फक्त गावात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच निवडीचा अधिकार होता. गावात दुफळी निर्माण व्हायची आता तसे होणार काही. तसेच फोडाफोडीचे राजकारण आणि घोडेबाजार न होता प्रत्यक्ष सरपंच निवडीचा अधिकार ग्रामस्थांना मिळणार आहे.
- संतोष गार्डी
माजी सरपंच चिंचबाईवाडी, ता. खेड