पोलिसांच्या मागे चौकशीचे ‘शुक्ल’काष्ठ
By Admin | Updated: June 12, 2017 01:40 IST2017-06-12T01:40:30+5:302017-06-12T01:40:30+5:30
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या ‘बदली रॅकेट’चे पुणे कनेक्शन असल्याची माहिती तपासादरम्यान

पोलिसांच्या मागे चौकशीचे ‘शुक्ल’काष्ठ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या ‘बदली रॅकेट’चे पुणे कनेक्शन असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आल्यामुळे येत्या काही दिवसांत आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रॅकेटमधील आरोपी विशाल ओंबाळे हा पुण्यातील काही वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, यातील एका अधिकाऱ्याच्या बदलीसाठी त्याने गृहमंत्रालयामध्ये वजनही टाकल्याची चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.
भारतीय प्रशासक सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांसह राज्य सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देण्यामध्ये आघाडीवर असलेले रॅकेट पोलीस उपायुक्ताच्या तक्रारीवरून उघडकीस आणण्यात यश आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विलेपार्ल्यातील एका बड्या हॉटेलमध्ये गेल्याच आठवड्यात ही कारवाई केली.
या कारवाईत महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे, सोलापूरचा किशोर माळी, पुण्याचा विशाल ओंबाळी आणि नवी दिल्लीचा रवींद्र यादव ही मंडळी या रॅकेटमध्ये काम करीत असल्याचे
समोर आले. कोट्यवधी रुपयांचे धनादेश, लाखो रुपयांची रोकड, शिक्के, महत्त्वाच्या कागदपत्रांसह या सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
मंत्रालयातील खास ओळख आणि गृह मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्काचा फायदा उठवत या रॅकेटने गेल्या काही वर्षांत कोट्यवधींची माया गोळा
केली आहे. विशेष म्हणजे यातील विशाल ओंबाळे या आरोपीला दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेचे शैलेश जगताप यांच्या माहितीवरून गजाआड करण्यात आले होते.
तत्कालीन उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे निरीक्षक सतीश निकम
यांच्या पथकाने ओंबाळेला गजाआड केले होते. त्याच्याकडून त्या वेळी लाल दिव्याची गाडी, केंद्रीय अधिकारी असल्याचे ओळखपत्र, तीन बेकायदा पिस्तुले, काडतुसे जप्त केली होती. त्या वेळी पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतला होता. या रॅकेटच्या संपर्कात जसे बडे अधिकारी होते
तसेच अनेक बॉलिवूड कलाकारही होते. आलिशान राहणीमान, उंची कपडे, महागड्या गाड्या आणि पंचतारांकित हॉटेल्समधील
वास्तव्य यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित होत होते.
ओंबाळे याने गेल्या काही महिन्यांमध्ये एका मध्यस्थामार्फत आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ओळख वाढवली. आपला पासपोर्ट परत मिळविण्यासाठी थेट अतिवरिष्ठामार्फत त्याने दबाव टाकायला सुरुवात केली होती. मुंबई गुन्हे शाखेने हे रॅकेट गजाआड केल्यानंतर त्याचे पुणे आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांची चर्चा सुरू झाली आहे.
ओंबाळेला ज्या पुणे पोलिसांनी अटक केली त्याच पोलीस
दलातील काही अधिकारी त्याच्या संपर्कात आले. गुन्हे शाखेतील
एक पोलीस कर्मचारी तर याच्या
नित्य संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. या रॅकेटच्या संपर्कात थेट गृहमंत्रालयातील काही
अधिकारी असल्याने तपासावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडीमार्फत
सखोल चौकशी करण्याची
मागणी केली जात आहे. सध्या या प्रकरणावर बोलण्यास एकही
वरिष्ठ अधिकारी तयार नाही.
मात्र, आगामी काळात ओंबाळेच्या संपर्कात असलेल्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.