भीमाशंकर - ओम नमः शिवाय.. हर हर महादेव... पंचामृत पूजा .. मंत्रघोष अशा मंगलमय वातावरणात श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार व सोमप्रदोष या महापर्वकाल प्रसंगी गजबजून गेले. या मुहूर्तावर राज्यभरातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोबत पावसाची संततधार, धुक्यांनी वेढलेला परिसर यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटले होते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी सुमारे दिड लाख भाविकांनी दर्शन घेतले. आज सुट्टी असल्याने जास्त गर्दी होती. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने मागील तीन दिवस मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत म्हणजेच सुमारे दीड किलोमीटर लांबपर्यंत गेली होती.हा आठवडा सुट्टयांचा असल्याने दररोज भीमाशंकरमध्ये गर्दी होणार आहे. तसेच भीमाशंकर मधील पाऊस देखील कमी झाला असून अधुनमधून पावसाच्या सरी पडत आहेत व धुक्याने संपुर्ण परिसर वेढलेला आहे. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी पुणे, मुंबई, नगर, नाशिक कडिल लोक मोठया संख्येने दिसले. त्यात वाडा मार्गे भीमाशंकरचा रस्ता अजुनही सुरू झाला नसल्याने सर्व वाहतूक मंचर घोडेगाव भीमाशंकर मार्गे सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.
बसस्थानका पासून मंदिरकडे येण्यासाठी नविनच सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला आहे. रस्ता करताना वन्यजिव विभागाने गटर काढू न दिल्याने सर्व पाणी रस्त्याच्या बाजुने व रस्त्यावरून वाहिले त्यामुळे रस्ता आतून पोखरला गेला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी हा रस्ता धोकादायक झाला आहे. पाऊस थांबल्या बरोबर हा रस्ता दुरूस्त केला जावा अशी मागणी भीमाशंकर ग्रामस्थांनी केली आहे.