मंचर : लोकसभेतील पराभवानंतर ही मी राजकारणात व सामाजिक जीवनात सक्रिय आहे. सर्वसामान्य लोकांना भेटतो, जनता दरबारात समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. गावागावांमध्ये विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. मी पुन्हा येणार असून २०२९ साली लोकांना वाटले तर लोकसभा निवडणूक लढवू त्यात चुकीचे काय आहे असे प्रतिपादन म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
लांडेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना आढळराव पाटील यांनी विविध विषयांना स्पर्श केला. मागील वीस वर्षाच्या राजकारणात एक रुपया खाल्ल्याचा आरोप माझ्यावर झाला नाही. खासदार नसताना सुद्धा मंचर नगरपंचायतीसाठी शंभर कोटींचा निधी आणला आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १३६ कोटी मंजूर केले. मात्र काहीजण मंचर नगरपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताहेत. या कामांची टेंडर निघून ती पूर्ण होत आली आहेत. मग आताच भ्रष्टाचाराचा आरोप कसा होतो असा सवाल करून ते म्हणाले निवडणुका लवकरच होणार आहेत. काम करणाऱ्या एका ठेकेदाराने मला सांगितले की संबंधितांनी त्याच्याकडे दहा लाख रुपयाची मागणी केली होती. ते न दिल्यानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत अशा बोलण्याला मी किंमत देत नाही असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. मी राजकारणात सक्रिय आहे दररोज लोकांना भेटतो, रविवारी जनता दरबार नित्यनेमाने सुरू आहे.गावागावात विकास कामांसाठी निधी दिला जातोय. मी सक्रिय राहणार व पुन्हा येणार २०२९ मधील लोकसभा निवडणूक लोकांना वाटले तर लढवणार असून त्यात चुकीचे काय असा सवाल त्यांनी केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा केला जात नाही. विशेषता २०१९ सालापासून पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे असे सांगून पाठपुरावा का होत नाही हे जनतेला समजले पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची आमची भूमिका आहे.युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल मात्र ग्रामीण भागात युती होईल असे वाटत नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार काम करणार असल्याचे ते म्हणाले. म्हाडाच्या मार्फत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जे काम चालू आहे ते सुरू ठेवण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने केला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.