शिवाजीनगर बसस्थानक मंगळवारपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 01:15 PM2019-12-30T13:15:51+5:302019-12-30T13:35:13+5:30

वाकडेवाडी येथे स्थलांतर : नियमित वेळापत्रकानुसार धावणार बस

Shivajinagar bus stand closed on from Tuesday | शिवाजीनगर बसस्थानक मंगळवारपासून बंद

शिवाजीनगर बसस्थानक मंगळवारपासून बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे वाकडेवाडी येथे एकूण उभारण्यात आले १९ फलाट सध्या शिवाजीनगर बसस्थानकातून दररोज सुमारे १४०० बस करतात ये-जा सर्व बस देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शिवाजीनगर येथील वर्कशॉपमध्येच येणार एसटीला मोठा वळसा घालून शिवाजीनगर ते वाकडेवाडी हे अंतर पार करावे लागणार

पुणे : मेट्रोच्या कामाला शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित केले जाणार आहे. मंगळवारपासून (दि. ३१) सर्व मार्गांवरील बस नियमित वेळापत्रकानुसार नवीन वाकडेवाडी स्थानकातून सुटणार आहेत. नवीन स्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती एसटी अधिकाºयांनी दिली.
मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथे एसटीचे बसस्थानक आहे. तिथून मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणांसाठी बस संचलन सुरू आहे. पुण्यात मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर हे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी मेट्रोचे जमिनीखाली स्थानक होणार आहे. त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच काही महिने आधीपासून वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राच्या जागेमध्ये नवीन बसस्थानक उभारणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तेथील कामही सुरू केले. पण विविध कारणांमुळे हे स्थलांतर रखडले होते. अखेर त्याला मुहूर्त मिळाला असून, मंगळवारपासून शिवाजीनगर स्थानकातील सर्व संचलन वाकडेवाडी येथील स्थानकातून केले जाणार आहे. हे स्थलांतर सोमवारीच करण्याचे नियोजन होते. पण ख्रिसमस तसेच दोन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे सोमवारी प्रवाशांची एसटीला खूप गर्दी असेल. अचानक स्थलांतर केल्यास त्यांची गैरसोय होऊ शकते. म्हणून मंगळवारपासून सर्व संचलन या स्थानकातून होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या शिवाजीनगर बसस्थानकातून दररोज सुमारे १४०० बस ये-जा करतात. औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, अकोला, गेवराई, बीड, लातूर, पणजी यांसह विदर्भ व मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून या बस ये-जा करत आहेत. या सर्व बस आता वाकडेवाडी स्थानकातून सुटतील. यापैकी एकही बस शिवाजीनगरकडे येणार नाही. वाकडेवाडी येथे एकूण १९ फलाट उभारण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. हे काम विलंबाने पूर्ण झाल्याने स्थलांतराला उशीर झाल्याचे अधिकारी म्हणाले.
.........
शिवाजीनगर येथील बसस्थानकात ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेचा मोठा आधार होता. शहराच्या विविध भागांतून स्थानकात येणारे तसेच बाहेरगावाहून एसटीने आलेले प्रवासी पुढील प्रवासासाठी पीएमपीला पसंती देत. एसटी स्थानकालगतच पीएमपीचे स्थानक असल्याने त्याला प्राधान्य मिळत होते. पण एसटीचे स्थलांतर झाल्याने तिथे ये-जा करण्यासाठी विविध ठिकाणांहून बस उपलब्ध होऊ शकणार नाहीत. 
...........
या ठिकाणांहून केवळ काही मोजक्याच मार्गाच्या बस धावतात. त्यामुळे शहरात विविध ठिकाणांहून ये-जा करणाऱ्यां प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यांना रिक्षाचाच आधार घ्यावा लागणार आहे किंवा पायपीट करत शिवाजीनगर गाठावे लागणार आहे. दरम्यान, याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पीएमपी अधिकाऱ्यांनीही बसस्थानक स्थलांतर होत असल्याने पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम होईल, असे सांगितले. त्यामुळे वाकडेवाडी येथून बस वाढविण्याबाबत पाहणी करून निर्णय घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
.......
वर्कशॉप शिवाजीनगरमध्येच
वाकडेवाडी येथील नवीन बसस्थानकामध्ये वर्कशॉपचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्व बस देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शिवाजीनगर येथील वर्कशॉपमध्येच येणार आहेत. तिथूनच या बस वाकडेवाडी स्थानकाकडे येतील. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे एसटीला मोठा वळसा घालून शिवाजीनगर ते वाकडेवाडी हे अंतर पार करावे लागणार आहे.
.......

Web Title: Shivajinagar bus stand closed on from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे