शिवाजीमहाराज मॅनेजमेंट गुरूच
By Admin | Updated: January 19, 2016 01:53 IST2016-01-19T01:53:00+5:302016-01-19T01:53:00+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते,

शिवाजीमहाराज मॅनेजमेंट गुरूच
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते, हे दिसून येते. हीच बाब विद्यार्थ्यांपर्यंत पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमातून येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ यांच्या सीबीएससी, बी. फार्मसी, डी. फार्मसी व टेक्नॉलॉजी या इमारतीच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते; त्या वेळी ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष एम. एन. नवले, एमआयटीचे सचिव मंगेश कराड, मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत छाजेड, कॉसमॉस बँकेचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते रसिकलाल व शोभा धारिवाल यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जैन विद्या प्रसारक मंडळ व रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने सीबीएससी बोर्डाशी संलग्न अभ्यासक्रम सुरू केला आहे. विविध अभ्यासक्रम व इमारतीसाठी फाउंडेशनच्या वतीने मंडळास नऊ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. पाच कोटी रुपये सीबीएससी इंग्रजी माध्यम शाळेसाठी, दोन कोटी रुपये फार्मसी अभ्यासक्रमासाठी, तर दोन कोटी रुपये पॉलिटेक्निक विभागासाठी देण्यात आले आहेत. या देणगीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
रसिकलाल धारिवाल म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा वसा घेतला की, ती गोष्ट सर्वोत्तम पद्धतीने झाली पाहिजे, असा माझा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यामुळे सुरू केलेले सीबीएससी इंटरनॅशनल स्कूल सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न करू, ज्याचा पालकांनाही अभिमान वाटायला हवा. शोभा धारिवाल म्हणाल्या की, सीएसआरअंतर्गत विविध संस्थांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. स्वागत राजेशकुमार साकला यांनी केले. आभार प्रकाश चोपडा यांनी मानले. आयोजन धनंजय कुलकर्णी व सतीश भारती यांनी केले. जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना सन १९२७ साली करण्यात आली. सुमारे १५००० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ६०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. रसिकलाल एम. धारीवाल फाउंडेशन आरोग्यसेवा, जनावरांसाठी चारापुरवठा, वृक्षारोपण, नेत्रशिबिर पाणीपुरवठा आदी उपक्रम राबवीत आहे.