पुणे: आंबीलओढ्याच्या सीमाभिंतीसाठी २०० कोटी रूपयांचा निधी मिळाल्याचे सांगून भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पुणेकरांची फसवणूक केली. त्याचा निषेध म्हणून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी दत्तवाडी परिसरात आंबीलओढ्यात उतरून आंदोलन करण्यात आले.
सन २०१९ मध्ये आंबीलओढ्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील वस्ती, झोपडपट्या तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारने ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी सरकारने २०० कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे जाहीर केले. त्याचे मोठमोठे फलक सत्ताधाऱ्यांनी शहरात लावले. हा निधी आला की नाही ते त्यांनाच माहिती मात्र आता इतक्या वर्षांनंतरही नियोजित सीमीभिंतीची एक वीटही उभी राहिलेली नाही अशी टीका शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी केली. ही पुणेकरांची भाजपने केलेली फसवणूकच आहे असा आरोप मोरे व थरकुडे यांनी केला.
फसव्या घोषणा करणाऱ्या भाजपचा निषेध, २०० कोटी मिळाले की नाही ते जाहीर करा अशा घोषणा देत भाजपने आता पुणेकरांची माफी मागावी व राज्य सरकारकडून ते २०० कोटी रूपये मिळवावेत, सीमाभिंतीचे काम त्वरीत सुरू करावे, कारण पावसाचे एकूण प्रमाण पाहता पुन्हा कधीही पूरसदृष स्थिती उदभवू शकते. त्याचा धसकाच स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. त्यांना असे धोक्याच्या स्थितीत ठेवणे योग्य नाही असे मोरे यांनी सांगितले. माजी नगरसेवक अशोक हरणावळ, सचिव मकरंद पेठकर,तसेच अनंत घरत, पंढरीनाथ खोपडे, आबा कुंभारकर, राजेंद्र शिंदे, दिपक जगताप, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, मनीषा गरुड, चंदन साळुंके, नंदू येवले, दत्ता घुले तसेच अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.