पुण्यात शिवसेनेला भोपळा ; नाराज शिवसैनिक मातोश्रीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 15:14 IST2019-10-01T15:11:13+5:302019-10-01T15:14:03+5:30
पुण्यातल्या युतीच्या कोट्यातील आठही जागा भाजप लढवणार असल्याने नाराज शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. मात्र भाजपच्या पहिल्याच यादीत आठही जागांची घोषणा झालेली असल्यामुळे आता शिवसैनिकांना दिलासा मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे.

पुण्यात शिवसेनेला भोपळा ; नाराज शिवसैनिक मातोश्रीवर
पुणे : पुण्यातल्या युतीच्या कोट्यातील आठही जागा भाजप लढवणार असल्याने नाराज शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. मात्र भाजपच्या पहिल्याच यादीत आठही जागांची घोषणा झालेली असल्यामुळे आता शिवसैनिकांना दिलासा मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे.
२०१४साली वेगवेगळे लढलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात भाजपला फायदा झाला आहे. त्यावेळी शहरातील आठही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्यामुळे आता भाजपने विद्यमान जागांचे कारण दाखवून एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे शहरात शिवसेना फक्त महापालिकेपुरती सीमित राहिली आहे. याचा परिणाम साहजिकच पक्षावर होणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह घटणार आहे. त्यामुळे निदान निम्म्या म्हणून चार नाहीत परंतु दोन जागा तरी शिवसेनेने लढवाव्यात अशी विनंती करण्यासाठी शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले आहेत. आता तिथून काय उत्तर मिळते याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेने हडपसर आणि शिवाजीनगर या दोन जागा प्रकर्षाने मागितल्या होत्या. कोथरुडमधूनही माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी तयारी केली होती. मात्र तिथे चंद्रकांत पाटील लढणार स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे भाजपने हडपसरमधून आमदार योगेश टिळेकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली असून विद्यमान आमदार विजय काळे यांना डावलून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच युतीचा फॉर्म्युला महापालिकेत लागू नसल्याने तिथे शिवसेना विरोधात आहे. त्यामुळे सत्तेचे कोणतेही फायदे त्यांना मिळत नाहीत. अशात लोकसभेत वाटा मिळाला नाही आणि आता विधानसभेतही कोणतीही जागा न मिळाल्याने शिवसैनिक नाराज आहेत. आता त्यांची ही नाराजी उद्धव ठाकरे कशी दूर करतात हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.