पेरण्याअभावी शिरूरचा शेतकरी धास्तावला
By Admin | Updated: July 17, 2014 03:30 IST2014-07-17T03:30:16+5:302014-07-17T03:30:16+5:30
पावसाअभावी तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, पाच गावांमधून टँकरची मागणी आली आहे.

पेरण्याअभावी शिरूरचा शेतकरी धास्तावला
शिरूर : पावसाअभावी तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, पाच गावांमधून टँकरची मागणी आली आहे. एकीकडे ही परिस्थिती निर्माण होत असताना खरिपाच्या एक टक्काही पेरण्या होऊ न शकल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे. पावसाने अशीच ओढ दिली, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
जुलैचा पंधरवडा उलटला, तरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मागील वर्षी जुलैअखेर २२५ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यात जूनमध्ये १३९, तर जुलैमध्ये ८६ मि. मी. पाऊस झाला होता. या वर्षी जून कोरडा गेला व जुलैदेखील कोरडा जाण्याच्या मार्गावर आहे. ढग जमा होतात आणि वाऱ्याबरोबर निघून जातात, अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी हतबल झाला आहे.
२0१२ मध्येदेखील जून, जुलै महिन्यात पाऊस कमी पडला होता. अवघ्या २१ मि. मी. पावसाची त्या वेळी नोंद झाली होती. एकूण ३२१ मि. मीच. पाऊस झाला होता. परिणामी, तालुक्यातील ११ गावे व १४८ वाड्यावस्त्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. २0१३-१४ मध्ये जून-जुलैमध्ये पावसाने चांगली सलामी दिली. सप्टेंबरमध्ये तर २८0 मि. मी. पाऊस झाला. एकूण ५५५.२0 मि. मी. पाऊस पडला. यामुळे जून (२0१३) मध्ये टँकर बंद झाले. दरम्यान, या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सध्या मिडगुलवाडी व मलठण येथे पाण्याचे टँकर सुरू करावे लागले. (वार्ताहर)