नव्या शैक्षणिक धोरणावर शिंदेवाडीच्या युवकाचा ‘ठसा’
By Admin | Updated: February 4, 2015 00:25 IST2015-02-04T00:25:39+5:302015-02-04T00:25:39+5:30
राष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी बारामती-माळशिरस तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या शिंदेवाडी येथील युवकाच्या कल्पकतेतून बोधचिन्हाची निर्मिती झाली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणावर शिंदेवाडीच्या युवकाचा ‘ठसा’
रविकिरण सासवडे - बारामती
राष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी बारामती-माळशिरस तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या शिंदेवाडी येथील युवकाच्या कल्पकतेतून बोधचिन्हाची निर्मिती झाली आहे. देशभरातून जवळपास तीन हजार स्पर्धकांनी यासाठी बोधचिन्ह तयार केले होते. त्यातून नवाज नजीर शेख यांच्या बोधचिन्हाची निवड केंद्र शासनाने केली आहे.
‘लोकमत’शी बोलताना त्याने कल्पकतेचे कंगोरो उलगडले. या तरुणाचे कौतुक करण्यासाठी सारा गाव लोटला होता. सोलापूर जिल्ह्यातील शिंदेवाडी गावात राहणारे नवाज शेख असे या युवकाचे नाव आहे.
‘राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था’ येथे तांत्रिक अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत. सध्या येथेच माधुरी ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एड्स-रोगप्रतीकारशक्ती’ या विषयावर पीएच.डी. करीत आहेत.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी बोधचिन्हाची स्पर्धा घेतली होती. देशभरातून जवळपास तीन हजार स्पर्धकांनी यासाठी बोधचिन्ह तयार केले होते. त्यातून नवाज यांच्या बोधचिन्हाची निवड शासनाने
केली आहे. नवाज यांना २७ जानेवारीला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बोधचिन्हाची निवड झाल्याचे कळवले. हा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नव्हता, असे नवाज यांनी सांगितले.
नवाज यांचे आई-वडिलांना अल्पशिक्षीत आहेत. त्यांच्या सर्वत्र होणारे कौतुक व केंद्र सरकारने केलेल्या सन्मानामुळे आई-वडीलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.
नवाजने नाव कमावल्यामुळे सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया नवाज यांचे वडील नजीर शेख यांनी व्यक्त
केली. त्यांना ही रेखाटन कला शिक्षक असलेल्या त्यांच्या मामांकडून मिळाल्याचे नवाज आवर्जून
सांगतात.
नवाज यांच्या बोधचिन्हाच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात असणारे शिंदेवाडी गाव एकदम राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आले आहे. शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनाही नवाज यांच्या यशाबद्दल सार्थ अभिमान
वाटत आहे.
सरकारी शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक व्हावा, हाच यामागचा उद्देश होता. त्यासाठी शिक्षणाचे प्रतीक म्हणून या बोधचिन्हामध्ये पुस्तक दाखवण्यात आले आहे. तेच पुस्तक हाताच्या ओंजळीप्रमाणे दिसत आहे. त्याच्यावर मानवी आकृती आहे. त्याच्याभोवती पृथ्वीचे प्रतीक म्हणून गोल काढण्यात आला आहे. तसेच, शासन ज्या बारा घटकांच्या आधारे शैक्षणिक धोरण राबवणार आहे ते बारा घटक चांदण्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहेत. याचा अर्थ असा, की शिक्षण तुमची काळजी घेते व तसेच ते तुम्हाला एक वैश्विक ओळखदेखील मिळवून देऊ शकते.’
‘सरकारी शाळांकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन सकारात्मक व्हावा. शासन नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे. त्यामध्ये देशाचा नागरिक म्हणून आपलाही सहभाग असावा, असे वाटत होते. बोधचिन्हाची निवड झाल्याने आनंद वाटत आहे.’
- नवाज शेख