शिंदे परिवाराच्या योगदानाची दखल नाही
By Admin | Updated: January 28, 2017 00:17 IST2017-01-28T00:17:14+5:302017-01-28T00:17:14+5:30
अतिशय दुर्गम भागातून आलेल्या शिंदे परिवाराने ग्रामिण जनता आणि शेतीशी कायम बांधिलकी जपली. रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण

शिंदे परिवाराच्या योगदानाची दखल नाही
पुणे: अतिशय दुर्गम भागातून आलेल्या शिंदे परिवाराने ग्रामिण जनता आणि शेतीशी कायम बांधिलकी जपली. रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत आणि आण्णासाहेबांनी कृषीक्षेत्रातील योगदाना मार्फत ग्रामीण जनतेतील अस्मिता आणि आत्मसन्मान जागृत केला. पंरतु, कुटुंबाची शिक्षण, शेती, ग्रामिण अर्थव्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील योगदाना बाबत हवी त्या प्रमाणात नोंद घेतली गेली नसल्याची खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि विचारवंत स्व. रावसाहेब शिंदे यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांचे पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होेते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी. डी. पाटील, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉ. संदीप वासलेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे प्रमुख पाहुणे होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांना, साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांना, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला. रावसाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होऊन जीवनात वेगळी पायवाट निवडणाऱ्या डॉ. बाळासाहेब शेंडगे आणि रविंद्र डोमाळे या दोघांचा कार्यकर्ता पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पवार म्हणाले , @@‘‘अण्णासाहेबांच्या निर्णयांमुळे ग्रामिण शेती अर्थव्यवस्था बळकट झाली. हरितक्रांतीत वैज्ञानिकांचे योगदान मोठे असते. त्यांनी लावलेले शोध आणि शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच हरितक्रांतीचे ध्येय साध्य झाले. परंतु या घटकांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका अण्णासाहेब आणि रावसाहेबांनी घेतली. रावसाहेबांना समाजातील चांगले लोक हेरून काढण्याचा जणु छंदच लागला होता. समाजातील चांगल्या, गुणी व्यक्ती हेरायच्या आणि त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवायचा हा रावसाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा महत्त्वाचा पैलू होता. राजकारणात रावसाहेबांना अनेक संधी उपलब्ध असताना, त्यांना त्याविषयी विचारणा होऊनही त्यांनी नम्रपणे त्यास नकार देत अण्णासाहेबांच्या मागे उभे राहण्याचे धोरण स्विकारले. ’’
पुरस्कार्थी डॉ.अनिल काकोडकर, ना.धों. महानोर आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)