शेळके दांपत्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:33+5:302021-02-05T05:06:33+5:30
खोडद : यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके व त्यांच्या पत्नी प्रियंका शेळके ...

शेळके दांपत्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार
खोडद : यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके व त्यांच्या पत्नी प्रियंका शेळके या दांपत्याला यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने 'यशवंत- वेणू' या गौरव सोहळ्यात दरवर्षी समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श व कार्याचा नंदादीप सतत समाजात तेवत राहावा व त्यांचा आदर्श घेऊन समाजात अनेक युवक घडावेत म्हणून मागील २० वर्षांपासून हा गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते महेश व प्रियंका शेळके यांचा गौरव करण्यात आला. या वेळी पिंपरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आदी विविध मान्यवर उपस्थित होते.
या वर्षी जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच कृषी, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सहकार, पर्यावरण व राजकीय क्षेत्रात एक यशस्वी वाटचाल उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेश शेळके यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने गौरविण्यात आले व त्यांच्या पत्नी सौ. प्रियंका यांनी महेश यांच्याबरोबर सामाजिक कार्यात व महिला सबलीकरण व महिलांचे आरोग्य या कार्यात मोलाचे योगदान दिल्याने त्यांना देखील गौरविण्यात आले आहे.
महेश शेळके हे जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावचे युवक असून, ते या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या पंचवार्षिकला त्यांच्या पत्नी प्रियंका यादेखील त्यांच्या पॅनलमधून विजयी झाल्या आहेत. दोघेही पती-पत्नी चालू वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला.
कॅप्शन : धनगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके व त्यांच्या पत्नी प्रियंका शेळके या दांपत्याला यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.