Shekhar Gaikwad becomes new Pune Municipal Commissioner; Saurabh Rao to be sugar commissioner | पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड ; सौरभ राव होणार साखर आयुक्त 
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड ; सौरभ राव होणार साखर आयुक्त 

पुणे : पुणे महापालिका आयुक्तसौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्याही बदलीचे आदेश निघाले असून त्यांच्या जागी आयुष प्रसाद कार्यभार सांभाळणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी राज्यातील १६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यात धडाकेबाज अधिकारी म्ह्णून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांचे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

  गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण येथील आहेत. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८४ साली कृषी सेवा वर्ग या पदासाठी निवड झाली होती. त्यांनी जिल्हा पुनर्विकास अधिकारी कोल्हापूर, मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम काम पहिले आहे. मागील वर्षी त्यांनी  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्ह्णून पदभार स्वीकारला. 

 सौरभ राव यापुढे राज्याचे साखर आयुक्त म्हणून काम पाहतील. सुरुवातीला पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यानंतर महापालिका आयुक्त आणि आता साखर आयुक्त म्हणून ते पुण्यातच काम करतील. माजी महापालिका आयुक्त कुणालकुमार यांची ८ मार्च २०१८ बदली झाल्यावर त्यांच्याजागी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २२ महिने काम पाहिले . 

Web Title: Shekhar Gaikwad becomes new Pune Municipal Commissioner; Saurabh Rao to be sugar commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.