पुणे : माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सारथी संस्थेला (छत्रपती शाहू महाराज रिसर्च, ट्रेनिंग अँड ह्यूमन डेव्हलपमेंट) मंगळवारी दुपारी भेट दिली. संस्थेच्या विविध योजनांबाबत त्यांनी विचारणा केली व काही सूचनाही केल्या. मात्र, त्यानंतर पत्रकारांबरोबर न बोलताच ते निघून गेले. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी नंतर पत्रकारांना या भेटीची माहिती दिली.सारथी संस्थेची स्थापना झाल्यानंतर शरद पवार प्रथमच संस्थेत आले होते. संस्थेकडून विद्यार्थी अभ्यासकांना संशोधनासाठी तसेच पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या काही रकमा सरकारकडून संस्थेला मिळालेल्या नाहीत, त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे पवार यांची ही भेट चर्चेचा विषय झाली. मात्र, ते बोलले नाहीत व काकडे यांनी पवार यांच्याकडून संस्थेची माहिती घेण्यात आली, त्याबाबत त्यांनी काही सूचना केल्या इतकेच सांगण्यात आले.काकडे म्हणाले, पवार यांनी स्वत: संस्थेला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचा संस्थेला निश्चितच आनंद आहे. संस्थेचे ९५ विद्यार्थी आयएएस तसेच आयपीएस म्हणून देशभरात कार्यरत आहेत. ७५० जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी सेवेत आहेत. संस्थेच्यावतीने ५ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही सर्व माहिती पवार यांनी घेतली व संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांना विविध आधुनिक व्यवसायांचे प्रशिक्षणही दिले जाते. ड्रोनचे प्रशिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थिनीने पवार यांच्याबरोबर संवाद साधला. संस्थेतून प्रशिक्षण घेऊन आपण आता दरमहा ६० ते ७० हजार रुपये मिळवत असल्याचे तिने पवार यांना सांगितले. या प्रशिक्षणात एआय तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, अशी सूचना पवार यांनी केली. संस्था राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देते, आता दापोली व परभणी कृषी विद्यापीठांमधूनही प्रशिक्षण दिले जाणार आहे. एआयची मदत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती पवार यांना दिल्याचे काकडे यांनी सांगितले.संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षेबाबत जे प्रशिक्षण दिले जाते, त्यात क्लासेसची निवड करण्याबाबत काही गडबड झाली असल्याची टीका होत आहे. याकडे काकडे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले. क्लासेसची निवड एका स्वतंत्र समितीच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर संस्थेकडून काही अधिकारी या क्लासेसना अचानक भेट देत असतात, अशी माहिती काकडे यांनी दिली.
सारथी संस्थेला शरद पवार यांची अचानक भेट; योजनांची घेतली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 21:12 IST