पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सेवा बंद पाडून आंदोलन केल्याची घटना रविवारी (9 मार्च) घडली. बेरोजगारी, स्थानिकांना नोकरीत डावलले जाणे आणि पोलिसांची गाड्या उचलण्याच्या पद्धतीला विरोध करत कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखून धरली. यामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला.
मेट्रो बंद आंदोलन आणि पुणेकरांची अडवणूक
नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याने पुण्यातील मेट्रो वाहतूक रोखून धरली. त्याने आपल्या समर्थकांसह मेट्रो स्टेशनबाहेर घोषणाबाजी करत, “स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत”, असा नारा दिला. मात्र, अचानक त्यांनी मेट्रो सेवाच रोखून धरल्याने सामान्य प्रवाशांचे हाल झाले. या आंदोलनामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव आणि राडा
मेट्रो सेवा ठप्प केल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि हुज्जत झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त लावला आणि आंदोलकांना जबरदस्तीने बाजूला हटवले. नरेंद्र पावटेकर याला घटनास्थळीच अटक करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली कठोर भूमिका, नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने आंदोलनाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाने अधिकृत निवेदन काढून नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली.
पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुदाम जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
“नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षीय आंदोलनात किंवा कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. आज त्यांनी केलेले मेट्रो आंदोलन हे पूर्णतः वैयक्तिक असून पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यांनी पुणेकरांची अडवणूक केली आणि पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे त्यांना पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात येत आहे. अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर काही वेळातच मेट्रो सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.