पुणे : दौंडच्या यवतमध्ये झालेल्या दोन गटांतील तणावाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. या घटनेवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. या घटनेचे समाजात तीव्र पडसाद उमटू नये आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, या विषयावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी परिसरातील सामाजिक वातावरण बिघडू नये, यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मिळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. अफवा पसरवणाऱ्यांवर आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. शांतता समितीच्या बैठका घेऊन दोन्ही समाजांतील प्रमुख नागरिकांशी संवाद साधावा, जेणेकरून गैरसमज दूर होतील. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर निश्चित कारवाई व्हावी, मात्र कोणत्याही निरपराध नागरिकाला त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्या आहेत.