पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-याला सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:13 IST2017-10-09T21:12:59+5:302017-10-09T21:13:11+5:30
ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणा-याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसावरच कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यास सात वर्षे सक्तमजुरीची आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-याला सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा
पुणे : ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणा-याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसावरच कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यास सात वर्षे सक्तमजुरीची आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के.कदम यांनी हा आदेश दिला आहे.
विलास अनिल गायकवाड (वय २८, रा. ताडीवाला रस्ता) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुहास पांडुरंग बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १५ नोव्हेंबर २००९ रोजी दुपारी अडीच ते २ वाजून ५५ मिनिटांनी घडली होती. सरकारी पक्षातर्फे देशमुख यांनी १० साक्षीदार तपासले. यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. कर्तव्य बजावणाºया पोलिसांवर होणारे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अशा हल्लेखोरांना कडक शिक्षा झाल्यास समाजात योग्य तो संदेश जाईल, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केला होता. तो ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपीस ७ वर्षांची शिक्षा सुनावली. एस. एम. नाडगौडा यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल हुंडेकरी यांनी मदत केली.
फिर्यादी ताडीवाला रस्ता पोलीस चौकीसमोर होते. त्यावेळी घरासमोरील पाण्याचे ड्रम कोयत्याने फोडून आणि नागरिकांना कोयता दाखवून एक व्यक्ती दहशत माजवत असल्याची माहिती एका महिलेने फिर्यादींना दिली होती. त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत, गायकवाड याला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने फिर्यादीवरच कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तो फिर्यादींनी चुकविला. त्यानंतर दुसरा वार डोक्यावर करीत असताना, तो अडविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटला होता.