सात व्हायोलिनवादकांची गजाननबुवा जोशींना स्वरांजली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:17 IST2018-04-05T16:48:09+5:302018-04-05T20:17:44+5:30
स्वरबहार या संस्थेच्या वतीने गायन वादनाचार्य पं.गजाननबुवा जोशी यांच्या १०७ व्या स्मृतीप्रित्यर्थ ही दोन दिवसांची बहारदार मैफल रंगली.

सात व्हायोलिनवादकांची गजाननबुवा जोशींना स्वरांजली...
पुणे: पुण्यातल्या सात व्हायोलिनवादकांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून पं. गजाननबुवा जोशी यांना स्वरांजली अर्पण केली. स्वरबहार या संस्थेच्या वतीने गायन वादनाचार्य पं.गजाननबुवा जोशी यांच्या १०७ व्या स्मृतीप्रित्यर्थ ही दोन दिवसांची बहारदार मैफल रंगली. गजाननबुवांचे शिष्य पं. भालचंद्र देव आणि त्यांच्या कन्या चारूशीला गोसावी यांनी सांस्कृतिक पुणेच्या सहकार्याने गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात या मैफलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वैष्णवी काळे, रजत नंदनवाडकर, डॉ. निलिमा राडकर, वसंत देव, देवेंद्र जोशी, अभय आगाशे यांनी आपले स्वतंत्र शास्त्रीय वादन केले. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या समारोपामध्ये गोसावी यांनी राग गावती आणि त्यांनीच तयार केलेली किरवाणी धून सादर करून आपल्या उत्तम व्हायोलिनवादनाची साक्ष दिली. पं.गजाननबुवांच्या काही रचनांचे एकत्रितपणे व्हायोलिनवर वादन करून अभय आगाशे, रजत नंदनवाडकर, वसंत देव, देवेंद्र जोशी, यांनी रसिकांना त्यांची शैली कशी होती ते विविध गीतातून ऐकविले.
कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी पं. गजाननबुवांच्या काही आठवणी आणि त्यांच्या जुन्या कार्यक्रमातील आणि मुलाखतीतील भाग यावर आधारित चित्रफित मुद्दाम तयार करून ती रसिकांसमोर दाखविण्यात आली. त्यासाठी सुभाष इनामदार यांचा सहभाग मोलाचा होता. नवीन व्हायोलिन वादकांमध्ये पं.भालचंद्र देव यांच्याकडे शिकत असलेला रजत नंदनवाडकर यांच्या वादनामध्ये चमक आहे. वाजविण्याची पध्दतही अधिक आकर्षक आहे. आणि वादनातले बारकावे त्याने सहजपणे साध्य केल्याचे दिसले. आगाशे यांनी सादर केलेला राग रागेश्री आणि राडकर यांचा मारुबिहाग अधिक पसंतीस उतरला. शेवटी पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य पं. भालचंद्र देव (वय ८३) यांनी आपले बहारदार वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग पूरिया आणि काही नाट्यपदे आपल्या वादनातून एकविली. आजही त्यांचा स्थिर हात रसिकांना मोहवून गेला. दोन्ही दिवशी रविराज गोसावी आणि मोहन पारसनिस यांनी तबल्याची साथसंगत केली. निवेदनाची धुरा राजय गोसावी यांनी सांभाळली.